सरदार पुरंदरे वाडा , सासवड शके १६२५ ( सन १७०३ ) मधील एका पत्रात 'कसबे' सासवडचे कुलकर्ण व कर्यात सासवडचे कुलकर्ण पदाबद्दल समस्त पुरंदरे यांनी अत्र्यांशी वाद घातले अशी नोंद आहे. शके १६१४ ( सन १६९२ ) च्या फाल्गुन महिन्यात तुकोपंत पुरंदरे, धनाजी जाधवांबरोबर चंजीस ( जिंजीस ) जाऊन जमिनीच्या सनदा घेत आहे, अशी एका पत्रात नोंद आढळते. यावरून असे म्हणता येईल की, पुरंदरे घराण्याकडे परंपरागत कुलकर्ण वतन होते. या घराण्यातील अंबाजीपंत ही व्यक्ती धनाजी जाधवराव यांच्या बरोबरीचीच असल्याचे दिसते. शके १६१४ मध्ये पुरंदरे मराठ्यांचे साक्षात नोकर होते. शके १६२४ मध्ये ते सुखवस्तू रयत आहेत. सासवड गाव कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे असे. शके १६२३ मध्ये अत्रे आणि पुरंदरे यांचा वाद असल्याचे दिसते. रामचंद्रपंत अमात्य, सेनापती धनाजी जाधवराव, सचिव शंकराजी नारायण यांच्याशी पुरंदरे यांचा दृढ परिचय होता. या घराण्यातील 'हेरंब' नावाचा माणूस बराच महत्त्वाचा होता. तुको त्र्यंबक, अंबाजी त्र्यंबक या बंधुद्वयाखेरीज त्यांचे चुलत भाऊ काशी, गोमाजी, गिरमाजी, विश्वनाथ व भाऊबंद चिंतो महादेव पुरंदरे ...