भीमाशंकर लेणी, मानमोडी टेकडी, जुन्नर ( पुणे ) सातवाहनकालीन बौद्ध धर्मातील थेरवाद (हीनयान) पंथीय लेणी संख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठा लेणी–समूह आहे. जुन्नर हे ठिकाण पुण्यापासून ९० किमी अंतरावर कुकडी नदीकिनारी वसले असून अवतीभोवती सुमारे आठ-दहा किमी. च्या परिघात मानमोडी, शिवनेरी, मांगणी, हातकेश्वर, लेण्याद्री, दुधारे इत्यादी टेकड्यांनी वेढलेले आहे. यांतील काही टेकड्यांत प्राचीन बौद्ध लेणी खोदली आहेत. जुन्नर लेणींचे साधारणतः नऊ समूह पाडता येतात. असाच एक समूह मानमोडी टेकडीवर आहे, ज्याचं नाव भीमाशंकर लेणी समूह आहे. या टेकडीत कुल तीन लेण्यांचे समूह आहेत. बाकीचे दोन लेण्या म्हणजे अंबा-अंबिका लेणी व भूतलिंग लेणी होय. या समूहात महत्त्वाच्या १७ लेणी असून इतर आठ अपूर्ण लेणी आहेत. त्यातील लेणी क्रमांक २ हे चैत्यगृह असून बाकी सामान्य खोल्या आहेत. या समूहात १३ पोढीही आहेत. लेणी क्रमांक १ च्या दर्शनी भागात, मध्यभागी दोन स्तंभ व बाजूंस अर्धस्तंभ आहेत. याच्या मागे ओसरी असून मागील भिंतीत तीन खोल्या आहेत. लेणी क्रमांक २ या चैत्यगृहाच्या दर्शनी भागाची उंची १२.२...