अविमुक्त क्षेत्र काशी, मुसलमानी शासक, पंडित गागाभट्ट व मराठे प्राचीन काळापासून हिंदूंच्या सर्वोच्च श्रद्धेचं स्थान आणि हिंदूधर्माच्या सांस्कृतिक व धार्मिक राजधानीचं स्थान म्हणून काशीक्षेत्र विख्यात आहे. आपल्या पापांची शुद्धी होण्याचे आणि मोक्ष मिळण्याचे क्षेत्र आणि महातीर्थ म्हणून काशीक्षेत्राला प्रत्येक आस्तिक हिंदू ओळखतो. पापमुक्तीचे स्थान म्हणून जसे काशीक्षेत्र हिंदूंमध्ये विख्यात आहे, तसेच काशीक्षेत्राची आणखी एक ओळख आहे आणि ती म्हणजे, काशीचा विश्वनाथ ! सश्रद्ध हिंदूंचे मस्तक ज्याचे नाव ऐकताच नमन करते आणि अबालवृद्धांपासून ते आस्तिक आणि नास्तिकांपर्यंत तसेच भारतात आणि भारताबाहेर ज्याच्यामुळे काशीक्षेत्र बहूविख्यात झाले, तो हा काशीचा विश्वनाथ अथवा विश्वेश्वर महादेव ! भगवान विश्वेश्वर महादेवाचे हे काशीक्षेत्र विविध साहित्यात विविध नावांनी उल्लेखलेले आहे. काश्रृ दीप्तौ म्हणजे स्वतेजाने प्रकाशणारी, ह्या संस्कृत धातुपासून काशी ह्या शब्दाची व्युत्पत्ती सांगितलेली आहे. परमेश्वर येथे साक्षात प्रकाशमान असतो, म्हणून यास काशी म्हणतात, असे काशीखंड सांगते. काशीचे दुसरे नाव म्हणजे बना...