असे पडले वृत्तपत्राचे नाव "सकाळ" सकाळ हे भारतातील पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी पुण्यात १ जानेवारी, १९३२ रोजी सुरू केले. दैनिक सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक आहे. या दैनिकाचे नाव सकाळ कसे पडले याची कहाणी रंजक आहे. नानासाहेब परुळेकर यांनी या वृत्तपत्राचे नाव काय असावे किंवा हे वृत्तपत्र लोकांपर्यंत कसे पोहोचेल, नवीन वृत्तपत्राची लोकांमध्ये उत्सुकता कशी निर्माण होईल याबाबत एक युक्ती लढविली. त्यांनी २० ऑक्टोबर, १९३१ रोजी केसरी, ज्ञानप्रकाश व काळ या वृत्तपत्रांमध्ये नव्या वृत्तपत्रासाठी नाव सुचवा ही जाहिरात प्रसिद्ध केली. दैनिकाला वाचकांनी नाव सुचवावे अशी स्पर्धा जाहीर करून त्यासाठी पहिल्या क्रमांकाला १५० रुपयांचे बक्षीस ठेवले तर दुसऱ्या क्रमांकालाही त्यांनी ५० रुपये बक्षीस जाहीर केले. सकाळच्या रौप्यमहोत्सवी अंकात स्वावलंबनाची कथा या लेखात परुळेकरांनी याविषयी लिहिले आहे, 'अमेरिकेतून शिकून आलेला हा गृहस्थ याला आपल्या पत्राचे नाव सुचत नाही मग हा लिहिणार काय? आणि पत्र चालविणार कस...