श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी ( स्मारक ), सदाशिव पेठ - पुणे / Shrimant Nanasaheb Pehwe Samadhi, Sadashiv Peth - Pune
श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी ( स्मारक ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले. त्यातले एक महत्त्वाचे पद म्हणजे पेशवे. पुढे ह्याच पेशव्यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या इतिहासात महत्वाची भूमिका बजावली. पेशवाईत अतिशय कर्तबगार योद्धे होऊन गेले ज्यांनी आपल्या पराक्रमाने अखंड भारतवर्षात नावलौकिक मिळवला, त्यातीलच एक बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे. नानासाहेबांना २५ जून १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्र दिली. त्यांच्या काळात संपूर्ण हिंदुस्थानाची राजकारणाची सूत्रे शनिवारवाड्यातून हलवली जायची. नानासाहेबांच्या कारकिर्दीत पुण्याच्या विस्तारासाठी नव्या पेठा उभारल्या गेल्या. पुण्यात अनेक सुधारणा केल्या गेल्या. मुठा नदीवरचा लकडी पूल तसेच सारसबाग, हिराबाग अशासारख्या १३ बागा नानासाहेबांच्या प्रेरणेने निर्माण झाल्या. शनिवारवाड्याची बाह्य तटबंदी, उत्तराभिमुख भव्य दिल्ली दरवाजाचे बांधकाम, पर्वतीवरचे श्री देव-देवेश्वर मंदिर, नसरापूर जवळचे श्री बनेश्वर मंदिर, त्र्...