पंचांग म्हणजे काय ? पंचांग या शब्दाची फोड पंच अंग अशी होते. भारतीय संस्कृतीत कालगणनेला अतिशय महत्व आहे. या कालगणनेसाठी आवश्यक असणारी पाच अंगे ज्या कोष्टकात येतात त्याला पंचांग असे सर्वसाधरणपणे म्हणतात. ही पाच अंगे खालील प्रमाणे : - तिथी : एका चांद्रमासात ३० तिथी येतात. (रोजच्या भाषेत आपण ज्याला चतुर्थी, पौर्णिमा, द्वादशी, एकदशी वगैरे म्हणतो) - वार : वार किंवा वासर (संस्कृत) हे सूर्योदयापासून पुढील सूर्योदयापर्यंतच्या गणनेस म्हणतात. जसे आजच्या भाषेत रविवार, शनिवार इ. - नक्षत्र : २७ नक्षत्रांचा उल्लेख आपल्या बोलण्यात अनेकदा येतो. चांद्रमास हे परीमाण धरल्याने त्या अनुषंगाने नक्षत्र काय हे पाहू. चंद्र आकाशातून जे भ्रमण करतो त्या वर्तुळाकृती कक्षेला क्रांतीवृत्त म्हणतात. या क्रांतीवृत्ताचे २७ समान भाग कल्पून प्रत्येक भागात येणाऱ्या विशिष्ट तारकासमूहाला नक्षत्र अशी संज्ञा आहे. खगोलशास्त्राप्रमाणे नक्षत्र हा तारकासमूहच असतो. आपल्याकडे मृग, आर्द्रा इ. नक्षत्रांचा उल्लेख विशेषतः शेतक-यांच्या संवादात येतो. - योग : चंद्रसूर्याच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास लाग...