सासवड दर्शन सासवड महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्घ स्थळ आहे. त्याची लोकसंख्या २६,६८९ (२००१) होती. ते पुणे जिल्ह्यात पुण्याच्या आग्नेयीस सु. २७ किमी. वर कऱ्हा नदीकाठी बाबदेव व दिवे घाटातून जाणाऱ्या जुन्या पुणे-सातारा रस्त्यावर वसले आहे. या गावाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही; तथापि हे बाळाजी विश्वनाथ (पहिला पेशवा) याच्या काळापासून भट घराण्याचे (पेशवे घराण्याचे) दक्षिणेकडील निवासस्थान होते. उत्तर पेशवाईतील पुरंदरे सरदारांचे हे मूळ गाव होय. या गावात पेशव्यांचा जुना वाडा असून सांप्रत तेथे तहसील कार्यालय आहे, तर पुरंदरे सरदारांचा वाडा संगमेश्वर मंदिराजवळ आहे. तो तटबंदीयुक्त आहे. कऱ्हा आणि एक उपनदी यांच्या संगमावर संगमेश्वराचे भव्य मराठाकालीन वास्तुशैलीचे मंदिर आहे.त्यांत भित्तिचित्रे, मूर्तिकाम व शिखरात चुनेगच्चीतील प्रतिमा नाहित. सासवडमध्ये इ. स. १८७९ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. नगरपालिका पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अन्य सुविधा पुरविते. पाणीपुरवठा मुख्यत्वे कऱ्हा आणि कम्बळी या नद्यांतील पाण्याद्वारे होतो; मात्र उन्हाळ्यात या नद्या आटत असल्यामुळे नगरपालिकेने जॅकवेलची ...