तुळशीबाग, पुणे ओंकारेश्वराची माहिती देताना डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिले होते की , एखाद्या देवाचेही नशीब असायला लागते. तुळशीबागेतल्या श्रीरामाबद्दलही आज नाइलाजाने असे म्हणणे प्राप्त आहे, कारण तुळशीबागेतल्या विविधरंगी दुकानांतून खरेदीची झुंबड उडविणाऱ्या तरुण पिढीतील मुली, स्त्रिया, आज देखल्या देवा दंडवत याप्रमाणेही श्रीरामाचे दर्शन न घेताच परत फिरतात, ही वस्तुस्थिती आहे. सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात चेष्टेने लिहिलेली वाक्ये तंतोतंत खरी ठरावीत, किंबहुना चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपासूनच , हा केवळ दैवदुर्विलास आहे. ते लिहितात, " पुण्यात खास बायकांसाठी बांधलेला तुळशीबाग नावाचा बाजार असून त्यात श्रीरामाचे देऊळही आहे. " आजची परिस्थिती बघता असे विधान आश्चर्यकारक वाटणार नाही. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी मात्र अशी परिस्थिती नव्हती. त्या काळी पुण्यातील स्त्रिया, मुली खास करून देवदर्शनासाठी या तुळशीबागेत येत असत. एवढेच नव्हे, तर पुराण-कीर्तन ऐकण्यासाठीही आबाल-वृद्धांची गर्दी होत असे. अगदी पहाटेपासून तुळशीबागेत भक्तमंडळींची लगबग चालू हो...