त्रिशुंड गणपती मंदिर तीन सोंड असल्याने त्रिशुंड या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे. तीन सोंड आणि सहा हात असलेल्या अशा या सुंदर विनायकाचे मंदिर सोमवार पेठ, घर क्रमांक १३९ येथे नागझरीच्या काठी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर अत्यंत सुंदर कोरीव काम आहे. प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूंना विष्णूच्या जय-विजय या द्वारपालांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. इथले सर्वात वेगळे आणि एकमेवाद्वितीय असे म्हणता येईल असे जे शिल्प आहे ते एकशिंगी गेंड्याचे. काही शिपाई हे गेंड्याला साखळदंडाने बांधताना दिसत आहेत. मंदिराच्या पाठीमागील बाजूस आगळ्या पद्धतीचे सहसा कुठेही न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे. यात फक्त शाळुंका असून वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह आणि शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारीत आहे. हे सर्व बघूनच मंदिराच्या आत प्रवेश केला. आतमध्येच एक तळघर असून ते फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडले जाते अशी माहिती मिळाली. तळघरात नेहमीच कंबरभर पाणी असते. गर्भगृहाच्याही दोन्ही ब...