सह्याद्री पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे. भूवैज्ञानिक इतिहास सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे वि...