वाड्यांचा इतिहास " वाडा " हा महाराष्ट्रात विकसित झालेला परंपरागत निवासस्थानाचा प्रकार आहे. हा वास्तुप्रकार पेशवेकाळात उदयास आला. मराठा साम्राज्यात साधारणपणे सतराव्या शतकाच्या शेवटी ते १८१८ पर्यंत (पेशवे ब्रिटिशांच्या अधीन होईपर्यंत) वाडासंस्कृती पुण्यात भरभराटीस आली. पुढे १९ व्या शतकातही वाडे बांधले गेले, परंतु पेशवेकाळातच वाड्यांची खऱ्या अर्थाने भरभराट झाली. पेशवा बाजीराव ( पहिला ) यांनी पुण्यास राजधानी हलविली. बाजीरावानी १७३०-३२ च्या सुमारास ‘शनिवार– वाडा‘ हा राजेशाही वाडा बांधला. त्यानंतर अठराव्या शतकाच्या मध्यावर पुण्यात अनेक मंदिरे, घाट आणि वाडे बांधले गेले. बाजीराव ( पहिला ) यांनी पुण्याला राजधानी बनविले, त्याआधी पुण्यात सहा पेठा अस्तित्वात होत्या. पेठ बांधणे हा सरकारी आणि खाजगी असा संयुक्त उपक्रम असे. त्याकाळी राज्यकर्ते आपल्यातल्या विश्वासू माणसांस पेठ बांधण्याचा हक्क, परवानगी आणि जबाबदारी द्यायचे. पेठा बांधण्याचे काम सरकारी नियोजन आणि तात्कालिक निर्णय यातून पूर्णरुपास यायचे. पेशवाईच्या काळात पेठा बांधण्याच्या कामाला औपचारिक स्वरूप आले. या काळात पेठा बा...