लाडक्या गणपती बाप्पाला मोदक का आवडतो ? असं म्हणतात की हृदयाचा मार्ग उदराच्या रस्त्याने जातो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीचं मन असो किंवा आपल्या आराध्य दैवताचं ! देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक" नेमका कधीपासून अस्तित्वात आला, कसा प्रचलित झाला हे जाणून घेणंही तितकंच रोचक आहे. मोदकाच्या उत्पत्तीचे संदर्भ दोन काळात विभागावे लागतात. एक पुराण काळातला आणि दुसरा अलिकडच्या काळातला संदर्भ. दोन पुराण कथांमध्ये मोदकाचा उल्लेख आहे. त्यापैकी एक पद्मपुराणातली कथा असं सांगतं की, एकदा देवीदेवता अमृतापासून सिद्ध केलेला दिव्य मोदक देवी पार्वतीसाठी घेऊन आले. देवी पार्वतीचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश दोघंही त्या मोदकास भुलले. दोघांनीही तो मोदक आपणास हवा असा हट्ट धरला. त्यावर देवी पार्वतीनं असा उपाय शोधला की जो धर्माचरणात श्रेष्ठ असेल त्याला या मोदकाची प्राप्ती होईल. त्यावर आपण ज...