श्री केसरीवाडा गणपती, नारायण पेठ - पुणे ( मनाचा पाचवा गणपती ) इ.स. १८९४ साली स्थापन झालेल्या केसरीवाडा गणपतीस थेट लोकमान्य टिळकांचा वारसा लाभला आहे. १९०५ साली नारायण पेठेतील श्रीमंत सरदार गायकवाड वाड्यात म्हणजेच नंतरच्या केसरी वाड्यात ( टिळक वाड्यात ) हा उत्सव साजरा होऊ लागला. तत्पूर्वी तो सदाशिव पेठेतील विंचूरकर वाड्यात साजरा होत असे. हा गणपती आधी गायकवाड वाड्याचा गणपती म्हणून ओळखला जात असे. मंडळाने शतकोत्तर रौप्यमहोत्सव ( १२५ वर्षे ) साजरा केला आहे. उत्सवी गणपतीची मूर्ती अत्यंत सुबक, रेखीव आणि सुंदर असते. गेली अनेक दशके मूर्तीच्या स्वरूपात बदल झालेला नाही. शनिवार पेठेतले मूर्तिकार गोखले हे श्रींची मूर्ती साकारतात. उत्सवमूर्तीच्या मागे एक थोडी मोठी अलीकडील सहा हातांची चांदीची मूर्ती करण्यात आली. हा श्री गणेश महावैष्णव ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील वर्णनानुसार साकारलेली आहे. त्यामागे लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा बघायला मिळतो. केसरी वाड्यात केसरी वृत्तपत्राचे कार्यालय आहे. गणेशोत्सवादरम्यान अनेक दिग्गजांची येथे व्याख्याने झाली आहेत. लोकमान्य टिळकांनी एकदा 'द...