झांशीची राणी लक्ष्मीबाई (१९ नोव्हेंबर १८३५–१८ जून १८५८) इंग्रजांविरुद्ध लढणारी १८५७ च्या उठावातील एक पराक्रमी स्त्री म्हणजे झाशीची राणी लक्ष्मी बाई होय. १९ व्या शतकातील वैधव्य प्राप्त झालेली स्त्री असूनही त्या सौदामिनीने आत्मविश्र्वासाने, स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह, स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य असा लढा दिला. आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटविला. झाशीच्या राणीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची आठवण ठेवूनच नेताजी सुभाषचंद्रांनी १९४३ च्या ऑक्टोबरमध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला ‘राणी झाशी रेजिमेंट’ असे नाव दिले. वेदकालीन पंचकन्यांइतक्याच श्रेष्ठ असणार्या या राणीच्या मृत्यूवर प्रत्यक्ष शत्रूनेही हळहळ व्यक्त केली. अवघ्या २८-२९ वर्षांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मोठ-मोठ्या संकटांचा सामना राणी लक्ष्मीबाईंना करावा लागला. परंतु कोणत्याही संकटापासून माघारी फिरणे त्यांना माहीत नव्हते. धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्या राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत...