भुलेश्वर मंदिर, माळशिरस भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण "मंगलगड" असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवर्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवर्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म...