जुना बाजार, पुणे " पुण्याच्या जुन्या बाजाराला पेशवाईपासूनचा, म्हणजेच साधारण दोनशे वीस वर्षांचा इतिहास आहे. मंगळवार पेठेत दर बुधवारी आणि रविवारी भरणाऱ्या या जुन्या बाजाराने अनेक दुर्मिळ वस्तूंची भेट दिली आहे. " प्रत्येक शहरात एक जुना बाजार असतो. जो त्या शहराची ओळख, अविभाज्य घटक असतो. तसा पुण्याचाही आहे. मंगळवार पेठेत शिवाजी पुलाचा (नवा पूल) शनिवारवाड्याच्या बाजूला जिथे शेवट होतो, तिथून जवळच हा बाजार भरतो. काकासाहेब गाडगीळांच्या पुतळ्यापासून आपण रेल्वे स्टेशनकडे जाताना कुंभारवाड्याच्या समोर स्त्याच्या बाजूला दर रविवारी आणि बुधवारी हा बाजार न चुकता भरतो. त्यापूर्वी जुन्या बाजाराच्या जागा दोन-तीन वेळा बदलल्या. इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार आणि डॉ. अनिल अवचट यांच्या ‘पुण्याची अपूर्वाई’ या पुस्तकातील नोंदींनुसार पेशवाईनंतर हा बाजार शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात भरू लागला. नंतर नव्या पुलाखाली, आता महानगरपालिका आहे तिथे गेला. पूर्वी गुरांचा बाजारही तिथेच होता. जो नंतर गुलटेकडीला हलवला, मग हा बाजार शिवाजी आखाड्याच्या जागी गावठाणात हलला. शेवटी मंगळवार पेठेत आताच्या जागी स्थिरावला. पेश...