श्री काळाराम मंदिर, सोमवार पेठ ( पुणे ) "सुमारे ३००-३५० वर्षे जुनं असलेल्या काळाराम मंदिरात काळ्या संगमरावर कोरलेली रामाची मूर्ती आहे. त्यामुळेच या मंदिराला असे नाव देण्यात आले आहे." पुण्यातील सोमवार पेठेत सर्वांत प्राचीन श्री नागेश्वर मंदिर आहे. ह्याच मंदिराच्या पश्चिमेकडे नागेंद्रतीर्थ कुंड ( अर्थात पूर्वी होते, सध्या ते विलुप्त आहे ), उत्तरेकडे मारुती, पश्चिमेकडे पांडुरंग आणि विष्णू, पूर्वेकडे काळाराम अशी मंदिरे आहेत. नागेश्वर मंदिराभोवती असलेल्या या चार मंदिरांमुळे या जागेला पंचवटी असे म्हणत असत. मुठा नदीला मिळणारी नागझरी, एके काळी पुण्यातील स्वच्छ पाण्याचा स्रोत होता. या नागझरीच्या काठी असलेला सध्याच्या सोमवार पेठेचा हाच भाग पंचवटी म्हणून ओळखला जाई. त्याच भागात जुनी बेलबाग आणि जुनी तुळशीबाग होती. संत नामदेवांच्या एका ओवीत - "दक्षिण पुण्येश्वर देवो, नागेश्वर महादेवो। मूळ पीठी नागेंद्री पहावो, त्रिवेणी रूपे वहातसे।" असा जो उल्लेख आहे, तो याच परिसराला उद्देशून आहे. जुनी बेलबागेतून बाहेर आल्यावर रस्त्याच्या समोरच्या बाजूला श्री न...