सुजाता मस्तानी, पुणे पुणे आणि काही खाद्यपदार्थ यांचे एक वेगळे नाते असते. तो पदार्थ, तो निर्माता, तो दुकानदार याची एक स्वतंत्र ओळख असते. आंबा म्हटले की जसा हापूसच डोळ्यापुढे येतो, तसेच मस्तानी म्हणजे सुजाता हे गृहीत सत्य झाले आहे. पुण्याच्या सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम चौकात कोणे एकेकाळी रावजी मामा कोंढाळकर यांचे पानाचे दुकान होते आणि त्या दुकानात बर्फही मिळत असे; एवढाच काय तो या दुकानाचा थंडपणाशी संबंध होता. मात्र शरदराव कोंढाळकर, जे महाराष्ट्र सरकारच्या सेवेत होते, त्यांनी या पानाच्या दुकानाशेजारचे एक बंद पडू लागलेले किराणामालाचे दुकान भाडय़ाने घेऊन त्या जागी थंड पेये आणि आइस्क्रीम विकायचा घाट घातला आणि १९६७-६८ मध्ये सुजाता या आपल्या मुलीच्या नावाने आइस्क्रीमचे दुकान सुरू केले. थोडय़ाच दिवसांत येथे आइस्क्रीम सोबत मस्तानीही मिळू लागली. मस्तानी हा काही कोंढाळकर यांचा शोध नाही, तसा त्यांचा दावाही नाही. पूर्वी ‘दूध कोल्ड्रिंक’मध्ये आइस्क्रीम घालून हा पदार्थ विकला जात असे. मात्र त्यात बर्फ आणि साधे दूध व आइस्क्रीम यांचे मिश्रण असे. सुजाता दुकानाने यात बदल केले. बर्फाच्या जागी आ...