वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा - दगडांचा अथवा लाकडाचा) स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात. साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर एकावर एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन खोदून घेतले जातात. वीरगळाचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात. सर्वांत खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे, असे दाखवलेले असते. यातून लढाईचे कारण सुद्धा स्पष्ट होते. उदा. गाईसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई इ. मधल्या भागात वीर देवदूत किंवा अप्सरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखवलेले असते. सर्वांत वरच्या भागात वीर योद्धा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे, असे दाखवलेले असते.युद्धात मरण आल्यास स्वर्गलोकप्राप्ती होते असे यातवून सुचवायचे असावे. काही वीरगळ हे चंद्र सूर्य यांनी अंकित असतात. आकाशात चन्द्र सूर्य तळपत आहेत तोपर्यंत या वीरांची स्मृती कायम राहिली असे यातून सूचित करायचे असावे. काही वीरगळ हे सतीच्या हाताने अंकित असतात. ...