चतु:श्रुंगी माता मंदिर, पुणे नाशिकजवळच्या वणीचे म्हणजेच सप्तश्रुंगीदेवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतु:श्रुंगी. सप्तश्रुंगनिवासिनी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व अनेकांची कुलस्वामिनी. पेशवाईतील प्रसिद्ध सावकार दुलभशेठ या देवीचा मोठा भक्त होता व तो वणीला दर्शनास नेहेमी जात असे. कालांतराने त्याचे वय झाल्यावर देवीने त्याच्यासाठी तत्कालीन पुण्यानजीक प्रकट होत असल्याचा दृष्टांत त्यास दिला. परंतु वेळेआधीच दुलभशेठ देवीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा देवी पूर्ण प्रकट झालेली नसून तीन हात व चेहेराच प्रकट झाल्याचे त्यास आढळून आले. हे स्थान म्हणजेच चतु:श्रुंगी होय. अर्थातच या स्थानी दुलभशेठने मंदिर बांधले. पुण्यात उत्तर पेशवाईत दुलभशेठने नाणी पडण्याचा म्हणजेच टाकसाळीचा मक्ता घेतला होता, तसेच नाशिकजवळही दुलभशेठची एक टाकसाळ होती. दुलभशेठने पुण्यात एक धर्मशाळा बांधली व तेथे कालियामर्दनाची मूर्ती स्थापन केली. लक्ष्मीरस्त्यावर सतरंजीवाला चौकानजीक ही मूर्ती आजही पाहायला मिळते. चतु:श्रुंगी हे पूर्वीपासून पुणेकरांचे श्रद्धास्थान राहिले आहे. नवरात्रात गावातून तालीमबाज नारळाचे तोरण घेऊन चतु...