श्री कसबा गणपती मंदिर, कसबा पेठ - पुणे पुण्याच्या इतिहासात डोकावले तर पुण्याची मूळ वस्ती कसबा पेठेच्या भागात होती. 'कस्ब' या फारसी शब्दापासून कसबा शब्द आला असून त्याचा अर्थ होतो कारागिरी. कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदैवते. शुभकार्याची पहिली अक्षत ठेवण्याची येथे परंपरा आहे. अगदी 'लोकमान्य' बाळ गंगाधर टिळक यांच्याकडे झालेल्या मंगलकार्याची अक्षत येथे ठेवली गेली होती. कधीकाळी 'गोविंदाग्रज' म्हणजेच राम गणेश गडकरी यांनी नाटक लिहिल्यावर कसबा गणपतीसमोर ठेवून प्रार्थना केली होती. त्यांचा राहता वाडा येथून जवळच असलेल्या पिंपळाच्या पारासमोर होता. कसबा गणपतीबद्दल अनेक आख्यायिका सुद्धा रूढ आहेत. आज आपण या प्रसिद्ध गणपतीबद्दल जाणून घेऊयात. कसबा गणपती म्हटलं की राजमाता जिजाऊ व बालशिवबा यांचा मंदिराशी आलेला संबंध आपणास दिसतो. आदिलशाहीत पुणे शहाजीराजांकडे जहागिरी होती. जिजाऊ महाराज व शिवराय पुण्यात असताना मंदिर बांधले गेले. तेव्हा मंदिराजवळ असलेल्या लालमहालात शिवराय आणि राजमाता जिजाऊंचे वास्तव्य होते. आपल्याला इतिहासात एका अस्सल पत्रात उल्ले...