गुढी पाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढीपाडवा असे नाव असून या तिथीला वर्ष प्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष (इ. स. सु. ७८ वर्षांनंतर) या दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारतात तसेच भारताच्या इतर भागात नूतन वर्षारंभ याच दिवशी मानतात. ‘शालिवाहन’ ‘सातवाहन’चा अपभ्रंश असावा. सातवाहनांपैकी कोणी व कोणत्या प्रसंगी हा शक सुरू केला, हे निश्चितपणे सांगता येत नाही. शक हे परकीय असून त्यांच्यावर सातवाहनांनी मिळविलेल्या एखाद्या महत्त्वाच्या विजयदिनापासून ह्या शकाची सुरुवात झाली असावी, असे काही विद्वान मानतात. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात वर्षाचा आरंभ निरनिराळ्या देशांत भिन्नभिन्न महिन्यात होत असे. सु. ८०० वर्षांपूर्वी काश्मीर प्रांतात चैत्र हाच महिना प्रथममास मानीत, असे इतिहासकार अल बीरूनीच्या लेखांवरून दिसते. चैत्र शुद्ध १ हा दिवस तेथील लोक मोठ्या उत्साहाने पाळीत व हा परशत्रूस राजाने मागे हटविल्याचा दिवस आहे, असे ते समजत. गुप्तराजांची सत्ता एके काळी उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र पसरली होती, तेव्हा चैत्रारंभी वर्षारंभ होत असे, असे प्राचीन लेखांवरून दिसते. वसंत ऋतूचा आरंभ याच दिवशी होतो. ...