श्रीकार्तिकस्वामी मंदिर , पर्वती अटकेपार मराठी झेंडे नेणाऱ्या राघो भरारी म्हणजे राघोबादादा यांनी पर्वतीवर कार्तिकेयाचे मंदिर उभारले. परमप्रतापी बाजीराव पेशव्यांचे ते धाकटे चिरंजीव आणि पुण्याचे मोठ्या शहरात रूपांतर करणाऱ्या नानासाहेब पेशव्यांचे ते धाकटे बंधू. राघोबादादांचा कल थोडासा तंत्रमार्गाकडे होता. त्यांची दैनंदिन आचरणातील स्नानसंध्या - पूजाअर्चा - जपजाप्य , तांडव गणेशाची उपासना , विविध अनुष्ठाने पाहता , त्यांनी शिवपुत्र षडानन म्हणजे स्कंद किंवा कार्तिकेयाची मूर्ती स्वतंत्र देवालयात स्थापन केली. महाराष्ट्रात कार्तिकेयाची स्वतंत्र देवालये फारशी नाहीत. आपण जरी कार्तिकेयाला ब्रह्मचारी ( आणि स्त्रीद्वेष्टा ) समजत असलो आणि महाराष्ट्रात स्त्रियांनी कार्तिकेयाचं दर्शन न घेण्याची प्रथा असली , तरी दक्षिण हिंदुस्तानात सुब्रह्मण्यम किंवा मुरूगन म्हणून याच कार्तिकेयाच्या असंख्य मूर्ती व उपदेवालये किंवा देवळे आहेत. त्या षडाननाची उपासना , पूजा , दर्शन तेथील स्त्रिया नेहमी करत असतात. पर्वतीवरच ह्या कार्तिकेय मंदिराची उभारणी राघोबादादांनी करावी , हे मात्र त्यांच्या पत्नी आनंदीबा...