सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर, बुधवार पेठ - पुणे / Shrimati Lakshmibai Dagduseth Halwai Shree Datta Temple, Budhwar Peth - Pune
सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर बुधवार पेठ, पुणे भक्तजनांचं केवळ गुरुवारीच नव्हे, तर दररोज गर्दी खेचणारं दत्तमंदिर म्हणजे बुधवार पेठेतील सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर (संस्थान). त्याचं ऐश्वर्य काय वर्णावं ! हे दुमजली मंदिर अंतर्बाह्य सुंदर, श्रीमंत, किंबहुना देखणं आहे. रंगीबेरंगी सुगंधित फुलांनी सजवलेल्या तिथल्या नयनमनोहर दत्तमूर्तीपुढून हलू नये, असं भाविकांना वाटल्यास नवल नाही. कै. दगडूशेठ हलवाई आणि कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई हे सात्त्विक व धार्मिक प्रवृत्तीचे जोडपे होते. उत्तरप्रदेशातून ते पुण्यात येऊन स्थायिक झाले. पुण्यात ब्रिटिश काळात जी मोठी प्लेगची साथ आली होती, तेव्हा साथीमध्ये अनेक माणसे मृत्युमुखी पडली. दगडूशेठ हलवाईंच्या घरातीलही काही लोक दगावले. तेव्हा प्लेगने मृत्युमुखी पडलेल्यांना ब्रिटिश सरकारने नुकसानभरपाई दिली होती. श्रीमती लक्ष्मीबाईंनाही काही रक्कम मिळाली. ही रक्कम स्वतःसाठी न वापरता त्याचा विनियोग चांगला व्हावा यासाठी त्यांनी त्यांचे गुरू माधवनाथ महाराज (इंदूर) यांना सल्ला विचारला. महाराजांनी श्री गुरुदेव दत्...