मूर्तिभंजन आणि मंदिरविध्वंस इस्लामी राजवटींचे मुख्य वैशिष्ट्य होते मूर्ती फोडणे आणि देवळे पाडणे. त्यांचे अनुकरण भारतातील इस्लामी राज्यकर्त्यांनी कसे केले याची काही उदाहरणे पुढे देतो. मुहम्मद घोरीने ११९२ साली पृथ्वीराज चौहानाचा पराभव करून त्याला ठार मारले. त्यानंतर आपला गुलाम कुत्बुद्दीन ऐबक याला भारतात ठेवून घोरी गझनीला परत गेला. घोरी मेल्यावर कुत्बुद्दीन ऐबकच इथला सुलतान झाला. या कुत्बुद्दीन ऐबकाने मुहम्मद घोरीच्या आज्ञेवरून दिल्लीत एक मोठी मशीद बांधली. सत्तावीस बुतखान्यांचे म्हणजे मूर्तिमंदिरांचे साहित्य वापरून ती मशीद बांधली आहे असा फार्सी शिलालेखच तिच्यावर आहे. आता ती मशीद पडक्या अवस्थेत आहे आणि पुरातत्त्वखात्याच्या ताब्यात आहे. आजही तिथे हिंदू आणि जैन मंदिरांचे अवशेष पहायला मिळतात. कुत्बुद्दीन ऐबकच्याच काळात मुहम्मद बख्तियार खिलजी या त्याच्या सरदाराने १२०२ मध्ये बिहारमधील एक मोठा बौद्ध विहार पाडून टाकला आणि तिथल्या बौद्ध भिक्षूंची कत्तल केली. ती सर्व हकीगत तत्कालीन इतिहासकार मिन्हाजुद्दीन याने तबकात-इ नासिरी या त्याच्या फार्सी ग्रंथात लिहून ठेवली आहे. त्याच सुमाराला प्...