चित्रकथी चित्रकथी म्हणजे चित्रांच्या सहाय्याने सादर केलेली कथा. आदिवासी जीवनात चित्रकलेची फार मोठी परंपरा आहे. पिंगुळीच्या ठाकर आदिवासींचा चित्रकथी हा कलाप्रकार खूप नावाजलेला आहे. एका वेगळ्या चित्रशैलीतील परंपरा पिंगुळीच्या ठाकर आदिवासींनी जोपासली आहे ; मात्र ही कला वारली कलेसारखी फक्त भिंतीचित्रांपुरतीच मर्यादित नसून ती एक प्रयोगशील कला आहे. चित्रांच्या सहाय्याने कथा सांगण्याची कला म्हणजेच चित्रकथी. “वर्णकैः सह ये वक्ति स चित्रकथको वरः गायका यत्र गयन्ति विना तालेर्मनोहरम्” - असा चित्रकथी कलेचा उल्लेख सोमेश्वराच्या मानसोल्लास मध्ये आढळतो, एवढी ही कला जुनी आहे. ठाकर आदिवासी १५ इंच लांब आणि १२ इंच रुंद आकाराच्या कागदावर एका विशिष्ट्य शैलीत चित्रे काढतात. वनस्पती आणि मातीच्या रंगाने ही चित्रे रंगवितात. रामायण , महाभारतातील एखादे आख्यान निवडून प्रसंगानुरूप चित्रे काढतात. कथानकाच्या घटनाक्रमानुसार त्यांचा क्रम ठरलेला असतो. कागदाच्या दोन्ही बाजूस ही चित्रे काढली जातात. एका कथानकाच्या चित्रांची एक पोथी तयार होते. चित्रकथी म्हणजे चित्रांद्वारे सादर केलेली कथा. या कथा सादरीकरण...