मानाचे गणपती, पुणे संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात आणि भारता बाहेर गणेशोत्सव उत्साहात साजरा केलाच जातो. पण पुण्यातला गणेशोत्सवामध्ये काही वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. त्यातलीच एक म्हणजे मानाच्या पाच गणपतींची परंपरा. १८९३ सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा त्यामागे होती. पण स्वातंत्र्य मिळेपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा समाजात रुजली होती आणि स्वातंत्र्यानंतरही या सणाचा उत्साह आणि चैतन्य कायम राहिला. यामध्ये काळानुरुप काही बदल निश्चितच झाले. पण १२५ पेक्षा जास्त वर्षं उलटल्यावरही मानाच्या पाच गणपतींची परंपरा पुण्यात तितक्याच बारकाईने पाळली जाते. ही पद्धत सुरु कशी झाली, मानाच्या गणपतींच्या पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा इतिहास काय आहे, हे आपण जाणून घेऊया. १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर गणपती मंडळांची संख्या वाढत गेली. असं सांगितलं जातं की दुसऱ्याच वर्षी गणपती मंडळांची संख्या १०० वर गेली होती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचं नियोजन आणि त्याची रुपरेषा कशी असावी यावर चर्चा सुरु झाली. कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत मान...