किल्ले राजमाची - सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर 'उल्हास नदीचे खोरे' म्हणून ओळखला जातो. याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते. याच उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात राजमाची किल्ला वसलेला आहे. राजमाचीवर मनरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय. किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौध्द लेणं आहे. यालाच 'कोंढाणे लेणी' असे म्हणतात. ही लेणी कोंढाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्रेयेस २ कि.मी अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरुनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी 'कोंकणचा दरवाजा' संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंत...