श्री त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवार पेठ - पुणे पुणे शहरात अनेक प्राचिन मंदिरे आहेत, परंतु अप्रसिद्ध असलेल्या त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली पुण्यातील या मंदिरापेक्षा वेगळी आहे. वेरुळच्या कोरीव लेण्यासदृश्य असणारे हे मंदिर उपेक्षित राहण्यामागे १८ व्या शतकात पुण्यातील तत्कालीन सामाजिक परिस्थिती कारणीभूत असावी. पुण्याच्या पूर्वभागात नाग झरीच्या काठावर असणार्या सोमवार पेठेत व मंगळवार पेठेच्या काही भागात त्या काळात मोठे स्मशान होते. शहाजीराजांनी इ. स. १६०० मध्ये शहापुरा ही पेठ वसवली. १७३५ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या पेठेत व्यापाराला उत्तेजन देऊन या पेठेचा विकास करून या पेठेचे सोमवार पेठ हे नामकरण केले. या पेठेत गोसावी समाजाची मोठी वस्ती असणाऱ्या भागास गोसावीपुरा म्हणत. हा समाज सधन होता. सावकारी, सुवर्ण व रत्ने यांचा व्यापार त्यांच्या हातात होता. येथील स्मशानात अनेक गोसावी सत्पुरुषाच्या समाध्या होत्या. या समाध्यांशेजारी शिवमंदिरे उभारण्याची पद्धत त्या काळात होती. कित्येक समाध्यांचे अवशेष अद्यापही दृष्टीस पडतात, स्मशानामुळे येथील मंदिरांमध्ये भाविकांची वर्दळ नव्हती. त्रि...