त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवार पेठ ( पुणे ) य. त्र. मोरे हे फुले गणपतीच्या दर्शनास नित्यनेमाने जात असत. त्यांना दृष्टांत झाला आणि त्यानुसार शोध घेत त्यांना एक गणेश मूर्ती सापडली. तीन सोंड असल्याने या गणपतीला त्रिशुंड असा नाव देण्यात आला. तीन सोंड आणि सहा हात असलेल्या अशा या सुंदर विनायकाचे मंदिर पुण्यातील सोमवार पेठ, घर क्रमांक १३९ येथे नागझरीच्या काठी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर अत्यंत सुंदर कोरीव काम आहे. या मंदिराला तळघर असून ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी उघडले जाते. साधारण १८व्या शतकाच्या सुमारास पेशव्यांच्या राजवटीत हे मंदिर आकाराला आलं. गोसाव्यांनी ते बांधल्याचा इतिहास आहे. तळघरात दलपत गोसावी यांची समाधी सुद्धा आहे. गाभाऱ्यातील गणपतीला केलेल्या अभिषेकाचे पाणी या समाधीवर पडते. गर्भगृहात मोरावर बसलेली त्रिशुंड गणेशाची विलोभनीय मूर्ती असून, मूर्तीमागे शेषाशायी भगवानांची साडेतीन फूट उंचीची मूर्तीही आहे. त्रिशुंड गणेशाची उजवी सोंड मोदकपात्रास स्पर्श करणारी, मधली सोंड पाटावर रुळणारी; तर डावी सोंड मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीस स्पर्श करणारी आहे. मंदिराच्या आतील शिल्पकामही...