गडावर हनुमानाची मूर्ती का असते ? वायूप्रमाणेच हनुमानाची गती, तेज व त्वरा आहेत. तो पर्वतप्राय प्रचंड रूप धारण करू शकतो; यथेष्ट रूप धारण करण्याचा त्याचा हा गुण तर खास यक्षवंशीय गुण आहे. नंतरच्या काळात हा पूर्वीचा यक्ष- हनुमान रामकथेशी जोडल्यामुळे आदर्श रामभक्त म्हणून जनमानसात रूढ झाला. हनुमान शेंदूरलिप्त, रक्तवर्ण, भुतांचा स्वामी, रोगांपासून वाचविणारा, संततिदायक असल्याने गावात याचे स्थान पाण्याजवळ, पिंपळाखाली पारावर किंवा वेशीजवळ आढळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर कमीत कमी ५० तर जास्तीत जास्त २००० चे सैन्य असे. हे सैन्य ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अष्टौप्रहर डोळ्यात तेल घालून पहारा देत असे. रात्री-अपरात्री गडावर वावरणाऱ्या या मावळ्यांना तथाकथित भुताखेतांपासून संरक्षणासाठी हनुमंताचा मोठा आधार वाटायचा. गावोगावच्या वेशींचे रक्षण करणारा हा देव आपले गडावरही रक्षण करेल, अशी त्यांची गाढ श्रद्धा होती. त्यामुळे १६-१७ व्या शतकात मराठय़ांचे प्राबल्य असलेल्या गडांवर हनुमंताची मंदिरे वा घुमटय़ा स्थापन केलेल्या आपणास आढळतात. त्या वेळच्या रयतेच्या म...