चाफेकर बंधू प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. दामोदरपंत, बाळकृष्ण आणि वासुदेव अशी त्यांची नावे. त्यांच्या वडिलांचे नाव हरिपंत चाफेकर. ते कीर्तनकार होते. दामोदरपंत हे जेष्ठ पुत्र. त्यांचा जन्म २५ जून १८६९ रोजी कोकणात झाला. बाळकृष्ण व वासुदेव हे दामोदरपंतांचे कनिष्ठ बंधू. कालांतराने हरिपंत पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. दामोदरपंत व त्यांचे बंधू वडिलांना कीर्तनात साथ देत. दामोदरपंतांनी अनेक तरुण संघटित करून ‘आर्यधर्म प्रतिबंध निवारक मंडळी’ ही गुप्त संघटना स्थापन केली. त्यांना व्यायामाचा, भाले, तलवारी चालविण्याचा छंद होता. ती शस्त्रेही त्यांनी जमविली होती. त्यांचे बंधू व अन्य काही तरुणही या छंदास लागले. पुढे त्यांनी पिस्तुले मिळवून नेमबाजी करण्यात प्रावीण्य मिळविले. इंग्रज सरकारविषयी त्यांच्या मनात भयंकर असंतोष होता. दामोदर चाफेकर यांनी १६ ऑक्टोबर १८९६ रोजी मुंबईतील व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यावर डांबर ओतले व त्या पुतळ्याच्या गळ्यात फाटक्या जोड्यांची माळ घातली. पण मुंबईच्या पोलिसांना हे कृत्य करणाऱ्याचा तपास लागला नाही. त्यांना इंग्रजी भाषेचा तिरस्कार होता. त्यामुळेच ते ‘इंग्रजी भाषा ही व...