तुळशीबाग, पुणे
ओंकारेश्वराची माहिती देताना डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिले होते की, एखाद्या देवाचेही नशीब असायला लागते. तुळशीबागेतल्या श्रीरामाबद्दलही आज नाइलाजाने असे म्हणणे प्राप्त आहे, कारण तुळशीबागेतल्या विविधरंगी दुकानांतून खरेदीची झुंबड उडविणाऱ्या तरुण पिढीतील मुली, स्त्रिया, आज देखल्या देवा दंडवत याप्रमाणेही श्रीरामाचे दर्शन न घेताच परत फिरतात, ही वस्तुस्थिती आहे. सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात चेष्टेने लिहिलेली वाक्ये तंतोतंत खरी ठरावीत, किंबहुना चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपासूनच , हा केवळ दैवदुर्विलास आहे. ते लिहितात, " पुण्यात खास बायकांसाठी बांधलेला तुळशीबाग नावाचा बाजार असून त्यात श्रीरामाचे देऊळही आहे. " आजची परिस्थिती बघता असे विधान आश्चर्यकारक वाटणार नाही.शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी मात्र अशी परिस्थिती नव्हती. त्या काळी पुण्यातील स्त्रिया, मुली खास करून देवदर्शनासाठी या तुळशीबागेत येत असत. एवढेच नव्हे, तर पुराण-कीर्तन ऐकण्यासाठीही आबाल-वृद्धांची गर्दी होत असे. अगदी पहाटेपासून तुळशीबागेत भक्तमंडळींची लगबग चालू होई. तसा हा परिसर देवळांचा. गावातला अत्यंत मध्यवर्ती आणि सदा गजबजलेला. जोगेश्वरी, रामेश्वर, बेलबाग, तुळशीबाग ही त्या काळची प्रसिद्ध देवळे. त्यात गर्दीही भरपूर. त्यामुळे देवदर्शनाला निघाल्यावर सर्वांचे दर्शन घेऊन परत येण्यास सहज तास-दोन तास जात. स्त्रियांना घराबाहेर पडायची किंवा समवयस्क मैत्रिणींना भेटण्यासाठीची ही एक सोयही होती, कारण त्या वेळी बाजारहाट करणे ही घरातल्या पुरुषमंडळींची कामे असत. दिवसभर कामाच्या रगाड्यातून चार घटका विश्रांती आणि आनंद देणारा हा देवदर्शनाचा फेरफटका स्त्रियांना हवाहवासा वाटे.
तेव्हा तुळशीबाग म्हणजे श्रीरामाचे देऊळ असा अर्थ अभिप्रेत होता, बाजारहाटास जाणे हा नाही. त्याही आधी , शंभर वर्षांपूर्वी तर तुळशीबाग नावाचे ठिकाण म्हणजे अत्यंत रम्य परिसरातील वैभवशाली मंदिर म्हणून ओळखले जात असे . बरोबर दोनशे वर्षांपूर्वी म्हणजेच इ.स. १७ ९ ५ मध्ये तुळशीबाग मंदिराचे बांधकाम सर्वार्थाने पुरे झाले.
जवळजवळ तीस - बत्तीस वर्षे अखंडपणे या देवस्थानाच्या उभारणीचे काम सुरू होते. एक एक भाग बांधत बांधत, चौफेरच्या भिंतींसुद्धा सर्व काम पुरे झाले, त्या वेळी पेशवाईतला एक देखण्या मंदिर संकुलाचा भव्य आविष्कार लोकांच्या नजरेसमोर उभा ठाकला. " संस्थान " शब्दानेच संभावना व्हावी असा हा नेत्रदीपक परिसर, खरोखरीच तुळशीबाग संस्थान या नावाने प्रचलित आहे. या संस्थानाची स्थापना , पेशवाईच्या सुरुवातीपासूनच सर्व बऱ्या-वाईट काळात प्रत्यक्ष सहभाग असणारे पुण्यातील प्रसिद्ध नारो अप्पाजी खिरे यांनी इ.स. १७६१ मध्ये केली. " तुळशीबागवाले " या नावाला प्रतिष्ठा मिळवून देणारे ते आद्य पुरुष. कारण त्यांच्यामुळेच खिरे ' घराणे निदान पुण्याततरी तुळशीबागवाले म्हणून ओळखले जाऊ लागले. सरदार खाजगीवाल्यांकडे, सरकारच्या कोठीखान्यात कारकून म्हणून कामाला लागलेल्या या गृहस्थाचे चोख काम, शिस्त पाहून श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी त्यांना इ.स. १७५० मध्ये सरसुभेदारी दिली. गुरुवार पेठ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वसवली गेली. त्या पेठेचे नारो अप्पाजी कमाविसदारही होते.
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे अत्यंत कडक , कर्तव्यदक्ष , करारी ; पण तितकेच तडफदार , महत्त्वाकांक्षी आणि कर्तबगार. क्षुल्लक चुकांवरूनदेखील आपल्या जवळच्या भल्याभल्यांची हजेरी घ्यावयास ते कमी करत नसत. नारो अप्पाजींच्या कारभाराबद्दलची एक महती विशेष आहे की, माधवराव पेशव्यांच्या अकरा वर्षांच्या काळात एकदाही नारो अप्पाजींवर किरकोळही ठपका ठेवला गेला नाही. उलट, पेशवे स्वारीवर असताना निजामाने पुण्यावर हल्ला करून विध्वंस चालवला, तेव्हा नारो अप्पाजींनी अत्यंत कुशलतेने परिस्थिती हाताळून होणारे प्रचंड नुकसान टाळले. त्याबद्दल माधवरावांनी नारो अप्पाजींना गौरवले होते.
तुळशीबाग संस्थानाची स्थापना करून देवालयाचे काम योजताना नारो अप्पाजींची रसिक वृत्ती नजरेसमोर येते.
ही जागा म्हणजे सरदार खाजगीवाल्यांची तुळशीची बाग. त्यांच्या प्रचंड विस्ताराच्या बागेच्या परिसरातील एक कोपरा. या काळी पुण्याचा विस्तार जेमतेम बुधवार पेठेपर्यंतच होता. खाजगीवाल्यांचा वाडा आणि बाग ही पुण्याची दक्षिण सीमा. सध्याचा शिवाजी रस्ता कोतवाल चावडीपाशीच रिकामा होत होता. बाबू गेनू चौकात तर बाग होती. आजूबाजूला तुरळक घरे होती. इ.स. १७५२ मध्ये बंद केलेल्या आंबिल ओढ्याच्या प्रवाहाचे अवशेष चराच्या रूपाने पश्चिमेस दृष्टोत्पत्तीस येत. त्या काठी असणारी सतीची वृंदावने आणि देवळे म्हणजे गावाची पश्चिम सीमा. पुणे शहराचा हा कोपरा म्हणजे खाजगीवाल्यांची बाग, पलीकडील हरिपंत फडक्यांची बाग अशा नयनरम्य बागांचा परिसर. नवे मंदिर उभारण्यास हा भाग उत्तम आहे हे लक्षात घेऊन नारो अप्पाजींनी खाजगीवाल्यांकडून सुमारे एक एकराची तुळशीची बाग विकत घेतली व त्यावर बांधकाम चालू केले.
इ.स. १७६३ मध्ये विधीपूर्वक देवळाचा उंबरा बसवला. अत्यंत रेखीव अशा श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती इ.स. १७६५ मध्ये उमाजीबुवा पंढरपूरकर यांच्याकडून घडवून आणल्या व स्थापना केली. पुढच्या काळात श्रीराम मंदिराच्या समोर हात जोडून उभ्या असलेला दास मारुती, तर शेजारी गजानन, त्र्यंबकेश्वर महादेव, पाठीमागे शेषशायी भगवान, विठ्ठल-रखुमाई अशी मंदिरे बांधून सर्व परिसर मंदिरमय करून टाकला गेला . दक्षिणेकडील अनेक देवालयांचा परिसर वेगवेगळ्या देवदेवतांच्या मंदिरांनी व्यापलेला असतो. एकाच वेळी अनेक देवांचे दर्शन घेता यावे, अशा कारणामुळेही ही योजना होत असेल. तुळशीबागेतही याच पद्धतीनेही काम करवले आहे. पुण्यात तरी, एका परिसरात इतके सगळे देव एकत्र आलेली अशी ठिकाणे फारच क्वचित आढळतात. पुढे यात दत्तमंदिराचीही भर पडली.
विठ्ठल-रखुमाई मंदिरास अनंतस्वामींचा मठ म्हणत असत. सभामंडपाच्या मागे एक मारुतीचे स्थान आहे. बऱ्याच वेळा बाहेरगावाहून आलेली मंडळी या मारुतीसमोर शिदोऱ्या सोडून जेवत असत. त्यामुळे याला " खरकट्या मारुती " असे नाव पडले होते. पुणेकरांच्या तल्लख बुद्धीला काही वेळा दाद द्यावी लागते, ती अशा उपनामांमुळे. सरळ उल्लेख न करता तिरकस उल्लेख करणे, हा प्रकार पुण्यातल्या अनेक देवांनी, विशेषत : मारुतींनी भरपूर अनुभवला आहे. भांग्या, गवत्या, डुल्या, जिलब्या, पासोड्या अशा अनेक उपनामांनी ओळखल्या जाणाऱ्या मारुतींत या खरकट्या मारुतीची भर पडावी यात काय नवल.
तुळशीबागेला सभोवती भिंत असून पश्चिम, दक्षिण आणि उत्तरेस प्रवेशद्वारे आहेत. सर्वसाधारणपणे देवालयाचे प्रवेशद्वार पूर्वेला असते. परंतु ती प्रथा या ठिकाणी दिसत नाही. कदाचित खाजगीवाल्यांची बाग पूर्वेला असल्याने त्यामधून रस्ता काढण्याऐवजी उत्तरेकडून प्रवेशरस्ता करून तेथे प्रथम दार केले असावे. दक्षिणेस बाग आणि पश्चिमेस आंबिल ओढ्याचा खड्डा असा मोकळाच परिसर असल्याने तिथेही द्वारे केली आहेत. उत्तरेकडील प्रवेशद्वाराला संगीत दरवाजा असे नाव असून, त्यावर सुंदर नगारखाना बांधला आहे. तुळशीबागवाल्यांचा राहता वाडाही याच बाजूस शेजारी आहे . या नगारखान्याला सवाई माधवराव पेशव्यांनी व्यवस्थेसाठी वर्षासनही देऊ केले होते. नारो अप्पाजींच्या नंतर त्याचे चिरंजीव रामचंद्र नारो यांनीही संस्थानाची जबाबदारी नेटाने सांभाळली . त्या काळी देवदेवेश्वर संस्थानाचे खालोखाल तुळशीबागेचा बोलबाला असे.
पेशवाईच्या अखेरीस सर्वच अंदाधुंदी माजली होती , हे सर्वश्रुत आहे. त्यातच इ.स. १८१८ मध्ये पेशव्यांचे राज्य पूर्णत: संपले. इंग्रजी अमलात , एवढ्या प्रचंड संस्थानाची जबाबदारी आणि देखभालीची व्यवस्था फक्त तुळशीबागवाल्यांनाच पाहणे प्राप्त झाले . लोकांचा ओढा आणि मदत भरपूर असली तरी त्यात सर्वच व्यवस्था पूर्वीप्रमाणे चालवणे जिकिरीचे होऊन बसले. इ.स. १८८५ मध्ये समोरच्या मंडई किंवा रे मार्केटच्या उभारणीमुळे तर हा परिसर अत्यंत गजबजलेला व्यापारी भाग म्हणून ओळखला जाऊ लागला. उत्पन्नासाठी मंदिराच्या ओवऱ्यांच्या भागात दुकानांसाठी जागा दिली गेली. येणाऱ्यांची दर्शन आणि खरेदी अशी दुहेरी सोय झाली. गृहोपयोगी आणि नित्याच्या वापरण्याच्या सर्वच गोष्टी इथे विनासायास मिळू लागल्या. पुढे पुढे या बाजाराची महती एवढी वाढली की, कोणतीही गोष्ट हवी, तर पावले आपोआप तुळशीबागेकडे वळू लागली. " मिळत नाही " अशी उत्तरे या बाजाराला वर्ज्य होती . आता तर बाहेरगावचे पाहुणे पुण्यात आले की, बायकांची एक फेरी तुळशीबागेत होणारच, असा जणू नियमच होऊन बसला आहे. दुकानांच्या मांडामांडीत पश्चिमेच्या बोळातला दरवाजा मात्र कायमचा बंद कधी झाला, हे कळलेही नाही. पूर्वी निदान सायकल हातात घेऊन या बोळातून जाता येत होते. आता तर पायी जाणेही अशक्यप्राय झाले आहे कारण गर्दीचा रेटाच तेवढा प्रचंड आहे.
एके काळी वैभवसंपन्न परिसरात भक्तांच्या गर्दीत असणारा श्रीरामही आता फारच पोरका झाला आहे, कारण खरेदीपुढे लोकांना दर्शनाचे महत्त्व फारसे वाटत नाही. मंदिराचा १४० फूट उंचीचा सुवर्णकळसही आता इमारतींच्या गर्दीत झाकला गेला आहे. पूर्वी खूप लांबवरून या कळसाचे चमकते दर्शन होत असे. आता मात्र तो जवळ गेल्यावरच दिसतो, अशी परिस्थिती आहे. म्हणूनच " देवळाच्या परिसरातील बाजार " हा उल्लेख मागे पडून " मार्केटमधले देऊळ " असे विशेषण आज लावले जात असल्यास नवल वाटणार नाही. काळाचा महिमाच तसा आहे.
पुण्यातल्या पेशवाई मंदिरांपैकी तुळशीबागेचाच परिसर आजही रस्तारुंदीसारख्या वाचला आहे, त्यामुळे निदान पूर्वीच्या वैभवाच्या खुणा थोड्या तरी योजनेतून दिसतात. उद्याचे काय सांगावे ?
सन्दर्भ :
- हरवलेले पुणे ( डॉ. अविनाश सोवनी )
अनुक्रम : २२ , पान : १४१
Comments
Post a Comment