त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवार पेठ ( पुणे )
य. त्र. मोरे हे फुले गणपतीच्या दर्शनास नित्यनेमाने जात असत. त्यांना दृष्टांत झाला आणि त्यानुसार शोध घेत त्यांना एक गणेश मूर्ती सापडली. तीन सोंड असल्याने या गणपतीला त्रिशुंड असा नाव देण्यात आला. तीन सोंड आणि सहा हात असलेल्या अशा या सुंदर विनायकाचे मंदिर पुण्यातील सोमवार पेठ, घर क्रमांक १३९ येथे नागझरीच्या काठी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर अत्यंत सुंदर कोरीव काम आहे. या मंदिराला तळघर असून ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी उघडले जाते. साधारण १८व्या शतकाच्या सुमारास पेशव्यांच्या राजवटीत हे मंदिर आकाराला आलं. गोसाव्यांनी ते बांधल्याचा इतिहास आहे. तळघरात दलपत गोसावी यांची समाधी सुद्धा आहे. गाभाऱ्यातील गणपतीला केलेल्या अभिषेकाचे पाणी या समाधीवर पडते.
गर्भगृहात मोरावर बसलेली त्रिशुंड गणेशाची विलोभनीय मूर्ती असून, मूर्तीमागे शेषाशायी भगवानांची साडेतीन फूट उंचीची मूर्तीही आहे. त्रिशुंड गणेशाची उजवी सोंड मोदकपात्रास स्पर्श करणारी, मधली सोंड पाटावर रुळणारी; तर डावी सोंड मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीस स्पर्श करणारी आहे. मंदिराच्या आतील शिल्पकामही अद्वितीय असे आहे.
मंदिरासमोर विजय मित्र मंडळाची भव्य अशी गणेश मूर्ती आहे. ह्या मूर्तीचा स्वरुप प्राचीन त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिरातील मूर्तीप्रमाणेच आहे. मूर्ती ३ सोडांची असून या मूर्तीला ६ हात आहेत, मांडीवर शारदा, तसेच आजूबाजूला रिद्धीसिद्धी आणि मोरावर आरूढ असलेली ही मूर्ती आहे. थोडक्यात सांगितलं तर, या मंडळाची गणेश मूर्ति ही त्रिशुंड मंदिरातील गणेश मूर्तीची एक भव्य प्रतिमा आहे. पुण्यातील प्रसिद्ध अभिनव महाविद्यालयाच्या एका प्राध्यपकांकडून ही मूर्ती बनवून घेण्यात आली. अभिजीत व अरविंद घोंडफळे यांनी या नव्या मूर्तीचे रंगकाम केले आहे.
सन्दर्भ :
- पुण्याचे सुखकर्ता ( स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक )
महिती आभार :
- प्र. के. घाणेकर
- स्वप्निल नहार
Instagram - @TRAVELWALA.CHORA
Comments
Post a Comment