श्री त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवार पेठ - पुणे
पुणे शहरात अनेक प्राचिन मंदिरे आहेत, परंतु अप्रसिद्ध असलेल्या त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली पुण्यातील या मंदिरापेक्षा वेगळी आहे. वेरुळच्या कोरीव लेण्यासदृश्य असणारे हे मंदिर उपेक्षित राहण्यामागे १८ व्या शतकात पुण्यातील तत्कालीन सामाजिक परिस्थिती कारणीभूत असावी. पुण्याच्या पूर्वभागात नाग झरीच्या काठावर असणार्या सोमवार पेठेत व मंगळवार पेठेच्या काही भागात त्या काळात मोठे स्मशान होते. शहाजीराजांनी इ. स. १६०० मध्ये शहापुरा ही पेठ वसवली. १७३५ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या पेठेत व्यापाराला उत्तेजन देऊन या पेठेचा विकास करून या पेठेचे सोमवार पेठ हे नामकरण केले. या पेठेत गोसावी समाजाची मोठी वस्ती असणाऱ्या भागास गोसावीपुरा म्हणत. हा समाज सधन होता. सावकारी, सुवर्ण व रत्ने यांचा व्यापार त्यांच्या हातात होता. येथील स्मशानात अनेक गोसावी सत्पुरुषाच्या समाध्या होत्या. या समाध्यांशेजारी शिवमंदिरे उभारण्याची पद्धत त्या काळात होती. कित्येक समाध्यांचे अवशेष अद्यापही दृष्टीस पडतात, स्मशानामुळे येथील मंदिरांमध्ये भाविकांची वर्दळ नव्हती. त्रिशुंड गणेशाचे मंदिर उत्कृष्ट पाषाणशिल्प असूनही समाधी मंदिराची वास्तु अपल्यामुळे दुर्लक्षित राहिली.
कसबा पेठेतून मंगळवार पेठ दवाखान्याच्या दिशेने जकातेपुला नंतर, उजव्या बाजूस दगडी कोरीव शिल्पांनी नटलेले शुंड गणपतीचे मंदिर आहे. त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते. या मंदिराच्या निर्मितीमागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे या मंदिराची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे. कालमानानुसार येथे देवतांच्या व मंदिराच्या स्वरूपामध्ये थोडाफार बदल झालेला आढळतो. या मंदिरासंदर्भातील ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी २६ ऑगस्ट १७५४ मध्ये या मंदिराचे बांधकाम केले. १७५४ ते १७७० या दरमम्यान या मंदिराचे बांधकाम चालू होते. या मंदिरातील गर्भगृहाच्या चौकटीवर दोन संस्कृत व एक फारशी शिलालेख आहेत. पहिल्या संस्कृत शिलालेखात मंदिराच्या बांधकामाचा काल व रामेश्वराची ( श्री शंकर ) प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख असून दुसऱ्या शिलालेखात गीतेतील आरंभीचा नमनाचा श्लोक कोरलेला आहे, तर फारशी शिलालेखात हे स्थान गुरुदेवदत्तांचे असल्याचे नमूद केलेले आहे. या शिललेखांमध्ये मंदिराच्या बांधकामाची तारीख २६ ऑगस्ट १७५४ ही दिलेली आहे. हे शिलालेख सुस्पष्ट व सुवाच्च आहेत. संपूर्ण दगडी बांधकामाचे हे मंदिर पुरुषभर उंचीच्या दगडी ज्योत्यावर पूर्वाभिमुख उभे आहे. राजस्थानी, माळवा व दक्षिणात्य वास्तुशैलीचा संमिश्र वापर येथे करण्यात आलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आहेत. प्रवेशद्वाराच्या कोरीव चौकटीच्या वर धारदार कमान असून अगदी वरच्या बाजूस शेषशायी विष्णूची प्रतिमा आहे. यक्ष, किन्नर, लक्ष्मीमंत्र, मोर, पोपट, भैरव, मंगलकलश, दशावतार, गजान्तलक्ष्मी अशी अनेक मांगल्य दर्शविणारी चिन्हे प्रवेशद्वारच्या भिंतीवर कोरलेली आहेत. येथील एक शिल्प मात्र राजकीय दृष्टीकोणने वैशिष्ट्यपूर्ण आहे.
हिंदूस्थानातील तत्कालीन राजकीय परिस्थितीतीचे चित्रण या शिल्पातून साकार होते. इंग्रजांनी प्लासीच्या युद्धानंतर १७५७ मध्ये बंगाल व आसामवर सत्ता प्रस्थापित केली. याची दरवल मोठ्या खुबीने शिल्पकराने घेतलेली दिसते. एक इंग्रज शिपाई बंगाल व आसामचे प्रतीक असलेल्या गेंड्याला साखळ दंडाने बांधताना दिसत आहे. लवकरच इंग्रज हिंदुस्थानात आपले पाय रोवणार याची अप्रत्यक्ष भविष्यवाणी व इशारा या शिल्पातून स्पष्ट होतो. राजकीय परिस्थितीचे चित्रण करणारे असे हे शिल्प भारतातील मंदिरांमध्ये क्वचितच आढळत असावे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर उजव्या सोंडेची गणेशमूर्ती असून त्याखाली गणेशचक्र आहे. प्रदक्षिणेच्या वाटेवर दक्षिणेकडील भिंतीत नटराजाची मूर्ती असून उत्तरेकडील भिंतीत विष्णू व काळभैरवाच्या कलात्मक रेखीव मूर्ती आहेत. दक्षिणेकडील भिंतीत मंदिराच्या मागील बाजूस आगळ्या पद्धतीचे कुठेही सहसा न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे. यात फक्त शाळुंका असून त्यावर वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह व शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा ठळक प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारित आहे. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वासंदर्भात प्रश्न निर्माण झाला. या प्रसंगी एक देदीप्यमान अग्निस्तंभ प्रगट होऊन या स्तंभाचा आदि व अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णूने हंसाचे रूप घेऊन स्तंभाच्या अंताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर ब्रह्माने वराह रूपाने पाताळात मुसंडी मारली, परंतु या स्तंभाचा आदि व अंत दोघांनाही सापडला नाही. शेवटी दोघे श्री शंकर देवाला शरण गेले. आपापल्या परीने दोघेही श्रेष्ठ आहात, असे सांगून श्री शंकरान लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रगट केले. या कथेला शिल्पातून साकार करण्याची हातोटी शिल्पकराने उत्तमरीत्या साधलेली आहे.
गर्भगृहातील गणेश मूर्ती वेगळ्या स्वरूपातील आहे. एक मुख, तीन सोंडा, सहा हात असलेली काळ्या पाषाणातील मूर्ती मोरावर आरुढ आहे. उजवी सोंड मोदक पात्रास स्पर्श करीत असून मधली सोंड उंदरावर आहे, तर डावी सोंड मांडीवर बसलेल्या शक्ति देवतेच्या हनुवटीला स्पर्श करीत आहे. हा गणेश सत्व, तम व रज या गुणांनी युक्त आहे. बाजूस रिध्दी सिद्धी आहे. या मूर्तीस पाषाणाची मेघडंबरी आहे. गणेशाच्या वरच्या, उजव्या व डाव्या हातात अंकुश व परशू आहे. मोराच्या दोन्ही बाजूस मूसक व स्त्रीगण आहे. मुकुटाखाली पाठीवर रुळलेली गोडेदार केशरचना आहे. मूर्तीच्या मागे, भिंतीवर अतिशय रेखीव शेषशायी नारायणाची प्रतिमा असून भिंतीवर श्री गणेशयंत्र कोरलेले आहे. शिवमंदिराच्या स्वरुपात स्थापन झालेल्या या मंदिरात कालांतराने शाक्तपंथियांनी श्री गणेशाची स्थापना असावी. मात्र या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा निश्चित काल व ऐतिहासिक संदर्भ सापडत नाही. १९३२ ते १९५२ पर्यंत हे ऐतिहासिक कलात्मक शिल्प दुर्लक्षित होते. मंदिराला शिखर नसल्यामुळे या मंदिराचे अस्तित्व लक्षात येत नव्हते.
मंदिरासमोर विजय मित्र मंडळाची भव्य अशी गणेश मूर्ती आहे. ह्या मूर्तीचा स्वरुप प्राचीन त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिरातील मूर्तीप्रमाणेच आहे. मूर्ती ३ सोडांची असून या मूर्तीला ६ हात आहेत, मांडीवर शारदा, तसेच आजूबाजूला रिद्धीसिद्धी आणि मोरावर आरूढ असलेली ही मूर्ती आहे. थोडक्यात सांगितलं तर, या मंडळाची गणेश मूर्ति ही त्रिशुंड मंदिरातील गणेश मूर्तीची एक भव्य प्रतिमा आहे. पुण्यातील प्रसिद्ध अभिनव महाविद्यालयाच्या एका प्राध्यपकांकडून ही मूर्ती बनवून घेण्यात आली. अभिजीत व अरविंद घोंडफळे यांनी या नव्या मूर्तीचे रंगकाम केले आहे. ( सन्दर्भ : पुण्याचे सुखकर्ता )
तळघरात जिवंत झरा असल्यामुळे येथे पाणी भरते. दरवर्षी गुरुपौर्णिमेस तळघर स्वच्छ करून भाविकांसाठी खुले करण्यात येते. विश्वस्त मंडळाने येथील शिल्पांचे नुकसान होऊ नये म्हणून अनेक उपाय योजलेले आहेत. या अप्रतिम मंदिराची बहुसंख्या भाविकांना कल्पना नसल्यामुळे येथे भाविकांची वर्दळ नाही. त्रिशुंड गणपती मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिराची व्यवस्था उत्तम ठेवलेली आहे. शिल्पच्या दृष्टीकोणाण महत्वाचे असणारे त्रिशुंड गणेशाचे मंदिर खरोखरच अप्रतिम आहे.
Comments
Post a Comment