( मनाचा पाचवा गणपती )
इ.स. १८९४ साली स्थापन झालेल्या केसरीवाडा गणपतीस थेट लोकमान्य टिळकांचा वारसा लाभला आहे. १९०५ साली नारायण पेठेतील श्रीमंत सरदार गायकवाड वाड्यात म्हणजेच नंतरच्या केसरी वाड्यात ( टिळक वाड्यात ) हा उत्सव साजरा होऊ लागला. तत्पूर्वी तो सदाशिव पेठेतील विंचूरकर वाड्यात साजरा होत असे. हा गणपती आधी गायकवाड वाड्याचा गणपती म्हणून ओळखला जात असे. मंडळाने शतकोत्तर रौप्यमहोत्सव ( १२५ वर्षे ) साजरा केला आहे. उत्सवी गणपतीची मूर्ती अत्यंत सुबक, रेखीव आणि सुंदर असते. गेली अनेक दशके मूर्तीच्या स्वरूपात बदल झालेला नाही. शनिवार पेठेतले मूर्तिकार गोखले हे श्रींची मूर्ती साकारतात. उत्सवमूर्तीच्या मागे एक थोडी मोठी अलीकडील सहा हातांची चांदीची मूर्ती करण्यात आली. हा श्री गणेश महावैष्णव ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील वर्णनानुसार साकारलेली आहे. त्यामागे लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा बघायला मिळतो. केसरी वाड्यात केसरी वृत्तपत्राचे कार्यालय आहे.
गणेशोत्सवादरम्यान अनेक दिग्गजांची येथे व्याख्याने झाली आहेत. लोकमान्य टिळकांनी एकदा 'देह आणि आत्मा' या विषयावर व्याख्यान दिले होते. त्यांचे येथे व्याख्यान म्हणजे एक आकर्षण असायचे. लोकमान्य टिळकांनी केसरीतून गणेशोत्सवावर अग्रलेख सुद्धा लिहिले होते. न. चिं. केळकर, कृष्णाजीपंत खाडिलकर, चिंतामणराव वैद्य, चि. ग. भानू, शि. म. परांजपे आदी थोर लोकांनी येथे व्याख्याने दिली आहेत. सामाजिक, राजकीय, आरोग्य, अध्यात्म अशा विविध विषयांवरील व्याख्यानांची ही परंपरा आजही कायम आहे. त्याचबरोबर अनेक थोर शास्त्रीय गायक-गायिकांनीदेखील या गणपतीपुढे आपली सेवा अर्पण केली आहे. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, अरविंद गजेंद्रगडकर, प्रभा अत्रे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी आपली कला केसरीवाड्यात सादर केली आहे. आजही केसरी वाड्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांना चोखंदळ पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.
केसरीवाड्याचा गणपती स्थापनेच्या आणि विसर्जनाच्या वेळी पालखीतूनच आणला जातो व विसर्जनासाठी नेला जातो. ढोल-ताशा, नगारावादन अशा पारंपरिक वाद्यांची जोड मिरवणुकीत असतेच. कालौघात उत्सवाचे स्वरूप बदलले असले तरी केसरीवाडा गणेशोत्सवाने पारंपरिकता जपली आहे. २००२ सालापासून मंडळ विसर्जनास लक्ष्मी रस्त्यावरून न येता टिळक रस्त्यावरून जाऊ लागला. पुढे २०१२ सालापासून केसरीवाडा परत लक्ष्मी रस्त्याने विसर्जनास येऊ लागला. लोकमान्य टिळकांची चवथी पिढी मंडळाचा प्रबोधनाचा वारसा पुढे नेत आहे. मंडळ कुणाकडूनही देणगी घेत नाही. केसरीच्या निधीतून गणेशोत्सव साजरा केला जातो.
काही वर्षांपासून व्याख्यानांबरोबरच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी पाककला आणि पुष्प सजावट स्पर्धा असे अनेक उपक्रम मंडळातर्फे राबविले जातात. लोकमान्य टिळकांचा प्रबोधनाचा वारसा जपणारा, संस्कृती आणि परंपरेचं भान राखत उत्सव साजरा करत केसरीवाडा गणेशोत्सवाने आदर्श घालून दिला आहे. वर्षभर सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. केसरीवाड्यातच लोकमान्य टिळक संग्रहालय आहे. तेथे विंचूरकर वाडा व गायकवाड वाड्याचे छायाचित्र पहावयास मिळते. ते देखील गणेशभक्तांनी एकदा बघायला हवे.
सन्दर्भ :
▪︎पुस्तक - पुण्याचे सुखकर्ता
▪︎लेखक - स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक
Location :
Instagram :
Comments
Post a Comment