श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी ( स्मारक ), सदाशिव पेठ - पुणे / Shrimant Nanasaheb Pehwe Samadhi, Sadashiv Peth - Pune
श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी ( स्मारक )
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले. त्यातले एक महत्त्वाचे पद म्हणजे पेशवे. पुढे ह्याच पेशव्यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या इतिहासात महत्वाची भूमिका बजावली. पेशवाईत अतिशय कर्तबगार योद्धे होऊन गेले ज्यांनी आपल्या पराक्रमाने अखंड भारतवर्षात नावलौकिक मिळवला, त्यातीलच एक बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे.
नानासाहेबांना २५ जून १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्र दिली. त्यांच्या काळात संपूर्ण हिंदुस्थानाची राजकारणाची सूत्रे शनिवारवाड्यातून हलवली जायची. नानासाहेबांच्या कारकिर्दीत पुण्याच्या विस्तारासाठी नव्या पेठा उभारल्या गेल्या. पुण्यात अनेक सुधारणा केल्या गेल्या. मुठा नदीवरचा लकडी पूल तसेच सारसबाग, हिराबाग अशासारख्या १३ बागा नानासाहेबांच्या प्रेरणेने निर्माण झाल्या. शनिवारवाड्याची बाह्य तटबंदी, उत्तराभिमुख भव्य दिल्ली दरवाजाचे बांधकाम, पर्वतीवरचे श्री देव-देवेश्वर मंदिर, नसरापूर जवळचे श्री बनेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील देवालय, वेरूळचे घृष्णेश्वर या मंदिरांची उभारणी किंवा दुरुस्ती नानासाहेबांच्या काळात झाली.
नानासाहेबांच्या कारकीर्दीत अजून एक महत्वाची गोष्ट झाली, ती म्हणजे अफगाणिस्तान येथून हिंदुस्थानवर वारंवार होणारे हल्ले कायमचे थांबले. अफगाणिस्तान येथून होणारे हल्ले थोपविण्याची आणि थांबवायची ताकद तत्कालीन एकाही सत्तेमध्ये नव्हती. खुद्द मोगल बादशाह, जाट, रोहीले, शीख, राजपूत अशा सर्व सत्ता निष्प्रभ बनल्या होत्या. तेव्हा नानासाहेबांनी आपला चुलत बंधू सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि आपला थोरला मुलगा विश्वासरावच्या अधिपत्याखाली प्रचंड मराठी फौज उत्तरेत पाठवली. अहमदशहा अब्दाली आणि नादिरशहा यांच्या बलाढ्य सेनेशी मराठ्यांची पानिपतात लढाई झाली. ज्यात मराठ्यांचा जरी पराभव झाला, तरी पुढील कित्येक वर्ष तेथून हिंदुस्थानात परत एकही हल्ला झाला नाही.
नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीत मराठी साम्राज्याची सत्ता, वैभव, दरारा सारेच कळसाला पोचले होते. त्यांचा मृत्यू २३ जून १७६१ रोजी पर्वतीवरील पेशव्यांच्या वाड्यात झाला. तिथे त्यांचे एक सुंदर स्मारक आहे आणि दुसरे मुठा नदी काठी जिथे त्यांचा दहनविधी झाला.
पूना हॉस्पिटलच्या समोर रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या पायऱ्या उतरून खाली नदीपात्रात उतरले की समोर एका चौथर्यावर असलेली मेघडंबरी दिसते. हेच ते स्मारक होय.
संदर्भ :
मुठेकाठचे पुणे ( प्र. के. घाणेकर )
Comments
Post a Comment