असे पडले वृत्तपत्राचे नाव "सकाळ"
सकाळ हे भारतातील पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी पुण्यात १ जानेवारी, १९३२ रोजी सुरू केले. दैनिक सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक आहे. या दैनिकाचे नाव सकाळ कसे पडले याची कहाणी रंजक आहे.
नानासाहेब परुळेकर यांनी या वृत्तपत्राचे नाव काय असावे किंवा हे वृत्तपत्र लोकांपर्यंत कसे पोहोचेल, नवीन वृत्तपत्राची लोकांमध्ये उत्सुकता कशी निर्माण होईल याबाबत एक युक्ती लढविली. त्यांनी २० ऑक्टोबर, १९३१ रोजी केसरी, ज्ञानप्रकाश व काळ या वृत्तपत्रांमध्ये नव्या वृत्तपत्रासाठी नाव सुचवा ही जाहिरात प्रसिद्ध केली. दैनिकाला वाचकांनी नाव सुचवावे अशी स्पर्धा जाहीर करून त्यासाठी पहिल्या क्रमांकाला १५० रुपयांचे बक्षीस ठेवले तर दुसऱ्या क्रमांकालाही त्यांनी ५० रुपये बक्षीस जाहीर केले.
सकाळच्या रौप्यमहोत्सवी अंकात स्वावलंबनाची कथा या लेखात परुळेकरांनी याविषयी लिहिले आहे, 'अमेरिकेतून शिकून आलेला हा गृहस्थ याला आपल्या पत्राचे नाव सुचत नाही मग हा लिहिणार काय? आणि पत्र चालविणार कसे?' असे लोक म्हणत. त्यांच्या लक्षात आले नाही की निघणार म्हणून जाहीर झालेल्या पत्राबद्दल लोकांच्या मनात कुतूहल उत्पन्न होऊन पहिला अंक सपाट्यासरशी विकला जाण्याचा संभव होता. असे दोन तीन अंक वाचकांच्या हाती पडल्यावर मग नव्या वृत्तपत्राची ढब आणि करामत दिसू लागणार होती. तेवढ्यासाठी हा खटाटोप होता. शिवाय फलनिष्पत्तीच्या मानाने दोनशे रुपये खर्च अत्यल्प होता. परंतु हा कार्यकारणभाव बुद्धिजीवी म्हणून म्हणविणाऱ्यांच्या ध्यानात आला नाही. असो.
नाव सुचवा या आवाहनाने लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. नानासाहेब परुळेकरांचा हेतू सफल झाला होता. या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला एकूण ४००० नावे सुचविण्यात आली. १२६२ व्यक्तींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या नावांमधून फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी काशीनाथ भिडे यांनी सुचविलेले 'सकाळ' हे नाव अंतिम करण्यात आले. त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. विनायक परांजपे यांनी सुचवलेले 'उद्या' ह्या नावास दुसरे बक्षीस मिळाले. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ अ. वि. गृहामध्ये साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला होता.
( सन्दर्भ : सकाळ वृत्तपत्र आणि वृत्तपत्रसमूह - स्वाती सुहास कर्वे )
माहिती स्त्रोत :
▪︎ ज्ञात अज्ञात पुणे ( सुप्रसाद पुराणिक )
Instagram :
▪︎ @travelwala.chora
▪︎ @punesehai
Comments
Post a Comment