भुलेश्वर मंदिर, माळशिरस
मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात.
या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवर्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवर्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते.
कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. (युध्द आणि परकीय आक्रमण) इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.
भुलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्त्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे.
माहिती आभार : अन्तरजाल 🙏
छायाचित्र आभार : संतोष पांडेय 🙏
Comments
Post a Comment