इस्लामी राजवटींचे मुख्य वैशिष्ट्य होते मूर्ती फोडणे आणि देवळे पाडणे. त्यांचे अनुकरण भारतातील इस्लामी राज्यकर्त्यांनी कसे केले याची काही उदाहरणे पुढे देतो.
मुहम्मद घोरीने ११९२ साली पृथ्वीराज चौहानाचा पराभव करून त्याला ठार मारले. त्यानंतर आपला गुलाम कुत्बुद्दीन ऐबक याला भारतात ठेवून घोरी गझनीला परत गेला. घोरी मेल्यावर कुत्बुद्दीन ऐबकच इथला सुलतान झाला. या कुत्बुद्दीन ऐबकाने मुहम्मद घोरीच्या आज्ञेवरून दिल्लीत एक मोठी मशीद बांधली. सत्तावीस बुतखान्यांचे म्हणजे मूर्तिमंदिरांचे साहित्य वापरून ती मशीद बांधली आहे असा फार्सी शिलालेखच तिच्यावर आहे. आता ती मशीद पडक्या अवस्थेत आहे आणि पुरातत्त्वखात्याच्या ताब्यात आहे. आजही तिथे हिंदू आणि जैन मंदिरांचे अवशेष पहायला मिळतात.
कुत्बुद्दीन ऐबकच्याच काळात मुहम्मद बख्तियार खिलजी या त्याच्या सरदाराने १२०२ मध्ये बिहारमधील एक मोठा बौद्ध विहार पाडून टाकला आणि तिथल्या बौद्ध भिक्षूंची कत्तल केली. ती सर्व हकीगत तत्कालीन इतिहासकार मिन्हाजुद्दीन याने तबकात-इ नासिरी या त्याच्या फार्सी ग्रंथात लिहून ठेवली आहे. त्याच सुमाराला प्रामुख्याने बिहारमध्ये जे मोठे बौद्ध विहार होते ते उद्ध्वस्त करण्यात आले. काही इतिहासकारांचे असे मत आहे की भारतातून बौद्ध धर्म नामशेष होण्याचे एक कारण त्याची केंद्रे असलेल्या विहारांचा इस्लामी राज्यकर्त्यांनी केलेला नाश हे आहे.
उज्जैन येथील महाकालेश्वराचे ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्याचे तेव्हाचे मंदिर सुलतान इल्तुत्मिश याने पाडून टाकले, महाकालेश्वराची मूर्ती ( किंवा पिंड ) दिल्लीला नेली आणि दिल्लीतील तेव्हाच्या जामी मशिदीच्या पुढे, ती मशिदीत येणाऱ्यांनी, म्हणजे मुसलमानांनी, तुडवावी, म्हणून टाकली. ही हकीगतही मिन्हाजुद्दीन याने तबकात-इ नासिरी या ग्रंथात लिहून ठेवली आहे.
फीरोझशाह तुघलकाने जगन्नाथपुरीवर स्वारी करून तिथल्या मंदिरातील मूर्ती तोडली, आजूबाजूच्याही मूर्ती फोडल्या, त्या सगळ्या दिल्लीला आणल्या आणि निरनिराळ्या मशिदींच्या पायऱ्यांपुढे, मुसलमानांनी त्या तुडवाव्या म्हणून टाकल्या. ही सर्व हकीगत शम्स सिराज अफीफ या तत्कालीन इतिहासकाराच्या तारीख-इ फीरोझशाही या फार्सी ग्रंथात, आणि सीरत-इ फीरोझशाही या एका अनामिक ग्रंथकाराच्या फार्सी ग्रंथातही, सांगितली आहे.
बाबराच्या एका सरदाराने अयोध्येतील राममंदिर पाडून तिथे मशीद बांधली ही गोष्ट आता प्रसिद्ध आहे, म्हणून तिची पुनरुक्ती करत नाही. त्याने १५२६ साली ग्वाल्हेरचा किल्ला काबीज केला. तिथे भोवतालच्या कड्यांवर मोठमोठ्या जैन मूर्ती कोरलेल्या आहेत. त्या फोडण्याचा बाबराने हुकूम दिला हे त्याने बाबरनामा या त्याच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. त्याच्या हुकुमानुसार त्या मूर्तीची तोडफोड करून त्या विद्रूप करण्यात आल्या. पुढे जेव्हा शक्य झाले तेव्हा जैनांनी विशिष्ट प्रकारचे प्लास्टर वापरून त्यांची डागडुजी केली.
शाहजहाने १६३४ मध्ये लाहोर येथील एक गुरुद्वारा पाडून टाकला. शीख साधनांमध्ये त्याचे उल्लेख आले आहेत.
औरंगजेबाने तो गुजरातचा सुभेदार असताना १६४५-४६ मध्ये अहमदाबाद येथील एक सुंदर जैन मंदिर पाडून टाकले. तत्पूर्वी, १६३८ मध्ये, मँडेल्सो नावाच्या जर्मन प्रवाशाने ते पाहून त्याचे वर्णन करून ठेवले आहे. औरंगजेबाने ते मंदिर पाडल्याचा उल्लेख मिरात-इ अहमदी या गुजरातच्या फार्सी इतिहासात आहे आणि तेव्नो या शिवकालीन फ्रेंच प्रवाशाच्या प्रवासवृत्तातही आहे.
औरंगजेब बादशाह झाल्यावर त्याच्या हुकुमावरून १६६९ मध्ये काशी विश्वनाथाचे मंदिर पाडून टाकण्यात आले. तशी नोंद त्याच्या दरबारच्या अखबारात आहे. त्या जागेवर मशीद बांधण्यात आली. पुढे उत्तरेत मराठ्यांचा प्रभाव खूप वाढला तेव्हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्या जागेच्या शेजारी पुन्हा काशी विश्वनाथाचे मंदिर बांधले.
औरंगजेबाने उदयपुर, जोधपूर, जयपूर या परिसरात मार्च १६७९ ते ऑगस्ट १६८० या दीड वर्षाहून एखादा महिना कमीच अवधीत तीनशेहून अधिक मंदिरे पाडली. या सगळ्यांचा तपशील मआसिर-इ आलमगीरी या ग्रंथात दिलेला आहे.
पंढरपूरला औरंगजेबाचा मुक्काम असताना, जानेवारी १७०५ मध्ये, त्याने तिथले देऊळ पाडून टाका व लष्करातल्या कसाबांकडून तिथे गायी कापा असा हुकूम दिला आणि त्याच्या त्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यात आली असे त्याच्या एका अखबारात नमूद केलेले आहे.
पानिपताच्या पुढील वर्षी, १७६२ मध्ये, अहमदशाह अब्दालीने पंजाबात आक्रमण केले. या स्वारीत त्याने अमृतसर येथील हरमंदिर गुरुद्वारात बंदुकीची दारू भरून तो उडवून दिला, आणि गायी कापून त्यांचे रक्त गुरुद्वारा ज्या सरोवरात आहे त्या सरोवरात ओतले. ( शीख गोहत्या करीत नाहीत. गुरु गोविंदसिंग यांनी दुर्गाभवानीला अनुलक्षून रचलेल्या उग्रदंती या पंजाबी स्तोत्राच्या पाचव्या व सहाव्या कडव्यात ' मला तुर्कांना ठार मारण्याची आज्ञा दे, संपूर्ण जगातून गोहत्या दूर कर ', ' गायींची पीडा दूर करण्याची आमची आस पूर्ण कर ', आणि ' असुरांना मारून गायींचे रक्षण कर ', अशी देवीची आळवणी करणारे चरण आहेत. ) पुढे शिखांनी तो गुरुद्वारा परत बांधून काढला.
ह्या व्यतिरिक्त असे अनेक उदाहरण आहेत जिथ आपल्याला मंदिर/मूर्ति बद्दल विध्वंसात्मक इस्लामी विचार दिसून येतात.
सन्दर्भ :
लेखक - गजानन भास्कर मेहेंदळे
पुस्तक - छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...
Very well explained Thanks for sharing
ReplyDelete