मानाचे गणपती, पुणे
१८९३ सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा त्यामागे होती. पण स्वातंत्र्य मिळेपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा समाजात रुजली होती आणि स्वातंत्र्यानंतरही या सणाचा उत्साह आणि चैतन्य कायम राहिला. यामध्ये काळानुरुप काही बदल निश्चितच झाले. पण १२५ पेक्षा जास्त वर्षं उलटल्यावरही मानाच्या पाच गणपतींची परंपरा पुण्यात तितक्याच बारकाईने पाळली जाते.
ही पद्धत सुरु कशी झाली, मानाच्या गणपतींच्या पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा इतिहास काय आहे, हे आपण जाणून घेऊया.
१८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर गणपती मंडळांची संख्या वाढत गेली. असं सांगितलं जातं की दुसऱ्याच वर्षी गणपती मंडळांची संख्या १०० वर गेली होती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचं नियोजन आणि त्याची रुपरेषा कशी असावी यावर चर्चा सुरु झाली. कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत मानलं जातं. कसबा गणपतीचं मंदिर हे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे.
ग्रामदैवत म्हणून कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीला मानाचा पहिला गणपती हा मान देण्यात आला. या मंडळाच्या सार्वजनिक गणपतीला विसर्जनाचा पहिला मान देण्याचं लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवलं. म्हणून मग आजही कसबा गणपती हा विसर्जन मिरवणुकीत पहिला असतो. त्यानंतर मानाच्या दुसऱ्या गणपतीचं स्थान हे पुण्याची ग्रामदेवी मानल्या जाणाऱ्या तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपतीला मिळाला. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणार गुरुजी तालिम गणपतीला मानाचा तिसरा म्हणून तर तुळशीबाग मंडळाच्या गणपतीला मानाचं चौथं स्थान मिळालं. यानंतर स्वतः लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या केसरीवाडा गणपती हा मानाचा पाचवा गणपती मानला जातो.
पुण्यात मुख्य विसर्जन मिरवणुकीची सुरुवात महात्मा फुले मंडईमधून होते. नंतर ती लक्ष्मी रस्त्यावरून पुढे जाते. मुठा नदीच्या पात्रात गणपती विसर्जन होतं. दरवर्षी मिरवणुक सुमारे २५ ते ३० तास चालते. मिरवणुकीतल्या गणपती रथांसमोर, ढोल ताशा पथकांचं वादन, विविध कला सादर करणारे पथकं असतात.
मानाचे पाच गणपती ( पुणे ) :
१. श्री कसबा गणपती, कसबा पेठ
२. श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, बुधवार पेठ
३. श्री गुरुजी तालीम गणपती, बुधवार पेठ
४. श्री तुळशीबाग गणपती, बुधवार पेठ
५. श्री केसरीवाडा गणपती, नारायण पेठ
Comments
Post a Comment