पंचांग म्हणजे काय ?
पंचांग या शब्दाची फोड पंच अंग अशी होते. भारतीय संस्कृतीत कालगणनेला अतिशय महत्व आहे. या कालगणनेसाठी आवश्यक असणारी पाच अंगे ज्या कोष्टकात येतात त्याला पंचांग असे सर्वसाधरणपणे म्हणतात.
ही पाच अंगे खालील प्रमाणे :
- तिथी :
एका चांद्रमासात ३० तिथी येतात. (रोजच्या भाषेत आपण ज्याला चतुर्थी, पौर्णिमा, द्वादशी, एकदशी वगैरे म्हणतो)
- वार :
वार किंवा वासर (संस्कृत) हे सूर्योदयापासून पुढील सूर्योदयापर्यंतच्या गणनेस म्हणतात. जसे आजच्या भाषेत रविवार, शनिवार इ.
- नक्षत्र :
२७ नक्षत्रांचा उल्लेख आपल्या बोलण्यात अनेकदा येतो. चांद्रमास हे परीमाण धरल्याने त्या अनुषंगाने नक्षत्र काय हे पाहू. चंद्र आकाशातून जे भ्रमण करतो त्या वर्तुळाकृती कक्षेला क्रांतीवृत्त म्हणतात. या क्रांतीवृत्ताचे २७ समान भाग कल्पून प्रत्येक भागात येणाऱ्या विशिष्ट तारकासमूहाला नक्षत्र अशी संज्ञा आहे. खगोलशास्त्राप्रमाणे नक्षत्र हा तारकासमूहच असतो. आपल्याकडे मृग, आर्द्रा इ. नक्षत्रांचा उल्लेख विशेषतः शेतक-यांच्या संवादात येतो.
- योग :
चंद्रसूर्याच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास लागणाऱ्या कालावधीस योग अशी संज्ञा आहे. हा गणितीय आणि कालगणनेच्या दृष्टीकोनातून मांडलेला सिद्धांत आहे. ज्योतीषशास्त्रात योगांचे जे उल्लेख येतात त्याचा या योगाशी थेट योग नाही :) नक्षत्रांच्या आरंभापासून सूर्य चंद्राचे किती कला भ्रमण झाले यानुसारही योग गणना होते. एकूण २७ योग आहेत असे मानतात.
- करण :
तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण. हे ही कालगणनचे परिमाण मानले जाते. एकूण ११ करणे मानतात. ज्योतीषांच्या बोलण्यातून सहसा विष्टी या करणाचा उल्लेख ऐकण्यात येतो. हे ७ वे करण आहे.
.
भारतीय संस्कृतीतील कोणतेही शास्त्र, विद्या किंवा ज्ञान हे केवळ एकाच विशिष्ट हेतूने मांडले जात नसे. मानवाचे सर्वांगीण कल्याण हेच त्यामागचे ध्येय असे. पंचांग हेही केवळ कालगणना हा एकमेव हेतू डोळ्यासमोर मांडलेले नसून त्यावरून योग्य अयोग्य काल, किंवा निसर्गाचे चक्र आणि त्याचे होणारे दृष्य अदृष्य परीणाम याचा विचार शास्त्रवेत्त्यांनी केलेला आहे. पराशरादि ऋषींनी या पाचही अंगांच्या सहाय्याने मानवी जीवन सुखकर कसे होईल याचा विचार केल्याचे अभ्यासावरून दिसून येईल.
माहिती आभार : शीतल रानडे 🙏
Comments
Post a Comment