झांशीची राणी लक्ष्मीबाई
(१९ नोव्हेंबर १८३५–१८ जून १८५८)
इंग्रजांविरुद्ध लढणारी १८५७ च्या उठावातील एक पराक्रमी स्त्री म्हणजे झाशीची राणी लक्ष्मी बाई होय. १९ व्या शतकातील वैधव्य प्राप्त झालेली स्त्री असूनही त्या सौदामिनीने आत्मविश्र्वासाने, स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह, स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य असा लढा दिला. आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटविला.
झाशीच्या राणीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची आठवण ठेवूनच नेताजी सुभाषचंद्रांनी १९४३ च्या ऑक्टोबरमध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला ‘राणी झाशी रेजिमेंट’ असे नाव दिले. वेदकालीन पंचकन्यांइतक्याच श्रेष्ठ असणार्या या राणीच्या मृत्यूवर प्रत्यक्ष शत्रूनेही हळहळ व्यक्त केली. अवघ्या २८-२९ वर्षांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मोठ-मोठ्या संकटांचा सामना राणी लक्ष्मीबाईंना करावा लागला. परंतु कोणत्याही संकटापासून माघारी फिरणे त्यांना माहीत नव्हते.
धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्या राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या. पण राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या मनकर्णिका - मनु होत्या. महाराष्ट्रातील पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला असणार्या मोरोपंत तांबे यांची ही मुलगी! हे मोरोपंत तांबे मूळचे (जळगाव जिल्ह्यातील) पारोळ्याचे. महाराष्ट्रीय माता-पित्यांच्या (वडील-मोरोपंत; आई- भागीरथी बाई) पोटी काशी येथे जन्मलेल्या मनुने, पुढे शूरवीर झाशीची राणी बनून ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून अढळ स्थान प्राप्त केले.
राणी लक्ष्मीबाईंचा विवाह १८४२ मध्ये झाला. पेशव्यांच्या वाड्यात बागडणारी मनु झाशीचे राजे गंगाधरराव यांची ‘राणी लक्ष्मीबाई’ झाली. ‘राणी’ पदाच्या कसोटीला लक्ष्मीबाई पूर्णपणाने उतरल्या.
ब्रिटिशांनी देखील राणींचा उल्लेख `हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला होता. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक ग्रंथ, काव्य, पोवाडे लिहले व रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधिस्थानावर १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधिस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या -
" रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशीवाली।। ''
माहिती आभार :
१. मराठी विश्वकोश संकेतस्थळ
२. विकासपीडिया संकेतस्थळ
सदर पुतळा पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व चौकात आहे.
Comments
Post a Comment