"सुमारे ३००-३५० वर्षे जुनं असलेल्या काळाराम मंदिरात काळ्या संगमरावर कोरलेली रामाची मूर्ती आहे. त्यामुळेच या मंदिराला असे नाव देण्यात आले आहे."
पुण्यातील सोमवार पेठेत सर्वांत प्राचीन श्री नागेश्वर मंदिर आहे. ह्याच मंदिराच्या पश्चिमेकडे नागेंद्रतीर्थ कुंड ( अर्थात पूर्वी होते, सध्या ते विलुप्त आहे ), उत्तरेकडे मारुती, पश्चिमेकडे पांडुरंग आणि विष्णू, पूर्वेकडे काळाराम अशी मंदिरे आहेत. नागेश्वर मंदिराभोवती असलेल्या या चार मंदिरांमुळे या जागेला पंचवटी असे म्हणत असत.
मुठा नदीला मिळणारी नागझरी, एके काळी पुण्यातील स्वच्छ पाण्याचा स्रोत होता. या नागझरीच्या काठी असलेला सध्याच्या सोमवार पेठेचा हाच भाग पंचवटी म्हणून ओळखला जाई. त्याच भागात जुनी बेलबाग आणि जुनी तुळशीबाग होती. संत नामदेवांच्या एका ओवीत -
"दक्षिण पुण्येश्वर देवो, नागेश्वर महादेवो।
मूळ पीठी नागेंद्री पहावो, त्रिवेणी रूपे वहातसे।"
असा जो उल्लेख आहे, तो याच परिसराला उद्देशून आहे.
जुनी बेलबागेतून बाहेर आल्यावर रस्त्याच्या समोरच्या बाजूला श्री नागेश्वर मंदिराशेजारी दगडी बांधकामाचे सुमारे ३००-३५० वर्ष जुने काळाराम मंदिराचे प्रवेशद्वार दिसते. या काळाराम मंदिराला जुनी तुळशीबाग म्हणत. मंदिराला लाकडी खांबांवर उभा असलेला भव्य सभामंडप आहे. त्याच्या दोन्ही बाजूला प्रशस्त ओवऱ्या आहेत. सभामंडपात काचेची हंड्या-झुंबरे लटकवलेली आहेत. सभामंडपात समोरच्या बाजूस मारुतीची काळ्या पाषाणाची उभी आकर्षक मूर्ती आहे. सभामंडपातून २/३ पायऱ्या उंचावर गाभारा आहे. गाभाऱ्यात उंचावर चांदीच्या नक्षीदार प्रभावळीमध्ये राम,लक्ष्मण आणि सीता यांच्या काळ्या पाषाणातल्या मूर्ती आहेत. सदर मंदिराचा पेशवाईत दत्ताराम मोतीचंद या धनिक व्यापाऱ्याने जीर्णोद्धार केला होता. त्याच घराण्यातील नानाभाई दत्ताराम यांनी इ.स. १८७० मध्ये येथील सभामंडप बांधला. सध्या या मंदिराची मालकी श्रॉफ घराण्याकडे आहे. पूजेची व्यवस्था प्रभुणे कुटुंबाकडे आहे.
संदर्भ:
▪︎असे होते पुणे ( म. श्री. दीक्षित )
▪︎मुठेकाठचे पुणे ( श्री. प्र. के. घाणेकर )
▪︎पुणे शहरातील मंदिर ( डॉ. शां. ग. महाजन )
▪︎हरवलेले पुणे ( डॉ. अविनाश सोहनी )
▪︎सफर ऐतिहासिक पुण्याची ( संभाजी भोसले )
माहिती स्त्रोत:
▪︎आठवणी इतिहासाच्या ( फेसबुक पेज )
जय श्रीराम 🧡
Instagram: ©TRAVELWALA.CHORA
Comments
Post a Comment