पंत सचिवांचा वाडा
( शिरवळ , ता.खंडाळा ,जि.सातारा)
पुणे-सातारा महामार्गावर नीरा नदीच्या काठावर वसलेले ऐतिहासिक असे शिरवळ हे गाव. स्वराज्याची पहिली लढाई म्हणून ओळख असणारे हे ऐतिहासिक गाव .याच गावात असणारा हा पंत सचिवांचा भव्य वाडा. पुण्यापासून अवघ्या 60 किमी अंतरावर आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सचिव पदावर शंकराजी नारायण होते , यांच्या पुढील पिढीत भोर संस्थान निर्माण झाले. या संस्थानातील शिरवळ विभागाची प्रशासकीय कचेरी शिरवळ येथे होती. त्यासाठी भोरकरांनी हा भव्य वाडा बांधला. सुमारे १३० वर्षापूर्वीचा हा वाडा आजही पंतसचिव घराण्याच्या इतिहासाची साक्ष देतो आहे.
केदारेश्वर मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर पूर्वाभिमुखी उभ्या असलेल्या वाड्याच्या सागवानी महादरवाजा त्यावरील सुबक विटकाम आपलं लक्ष वेधून घेते. या वाड्यास एकूण दोन चौक आहेत. दरवाजातून आत आल्यावर पहिल्या चौकात समोरच भक्कम लोखंडी गजांची दारे असलेल्या खोल्या दिसतात, तसेच उजव्या हाताला लाकडी जिना त्यावर पत्र्याचे छप्पर आपणास बघावयास मिळते. जिना चढून गेल्यावर आपणास दोन सोपे दिसतात. पाहिल्या चौकाच्या बरोबर मध्य भागी असलेल्या लाकडी चौकटीतून आपण दुसऱ्या चौकात येऊन पोहचतो. चौकात आल्यावर उजव्या बाजूस पुन्हा तसाच भक्कम लाकडी जिना नजरेस पडतो. जिना चढून गेल्यावर आपणास दोन सोपे दिसतात. या चौकाच्या पश्चिमेच्या बाजूस दोन दिंडी दरवाजे आहेत. वाडा कौलारू असून अतिशय प्रमाणबद्ध आणि ताशीव लाकडांच्या मजबूत तख्तपोशिंनी युक्त आहेत.
सध्या हा वाडा रयत शिक्षण संस्थेकडे आहे. संस्थेचे आदर्श विद्यालय या वाड्यात भरत होते. पण सध्या वाड्याच्या शेजारी शाळेसाठी नवीन इमारतीचे बांधकाम झाल्यामुळे, आत्ता शाळा तिथे भरते. "रयत शिक्षण संस्थेने १ रुपये प्रति माह ह्या किमतीवर वाडा भाड्याने घेतली होती." - अशी माहिती आम्हाला आदर्श विद्यालयाच्या तत्कालीन मुख्याध्यापकांनी दिली होती.
सचिव घराणे :
भोरकर पंत सचिव घराण्याचा मूळ पुरुष शंकराजी नारायण. आपल्या कर्तुत्वाच्या बळावर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सचिव पदावर आले. तसेच राजाराम महाराजांच्या काळात देखील पराक्रमाची शर्थ केली. त्यांचा पराक्रम , स्वामिनिष्ठा देखोन राजाराममहाराज यांनी त्यास "राजाज्ञा" 'किताब दिला. २७ ऑक्टोबर १७०७ रोजी शंकराजी नारायण सचिव यांनी आपला देह नीरा नदीच्या काठावर अंबवडे गावी ठेवला. भोर संस्थानात एकूण ५०२ गावे होती ; शिरवळ ,नसरापूर ,कोळवण , वेल्हे, पाली या पाच महालांत विभागली होती. त्यापैकी भोर , शिरवळ ,व पाली येथे नगरपालिका होत्या. तेथे स्वतंत्र अधिकारीवर्ग असून त्यासाठी प्रशासकीय कार्यलयाची स्वतंत्र इमारत असे. तोच हा शिरवळमधील वाडा. भोर संस्थानचा वैभवशाली इतिहास घेऊन उभा आहे.
टीप : वाडा आतून बघण्यासाठी आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची परवानगी घेणे अनिवार्य आहे.
संदर्भ :
- महाराष्ट्रतील ऐतिहासिक वाडे
- भोर संस्थान
माहिती आभार :
- महेश्वर चव्हाण
- विकास चौधरी
मार्गदर्शन आभार :
- पियुषा मरगजे
Comments
Post a Comment