बुधवार पेठेचा इतिहास , पुणे
सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.
पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.
सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ जवळ ३० वर्षे हे मंदिर बांधायला लागली. सन १७६१ मध्ये नारो अप्पाजी खिरे यांनी या मंदिराच्या पायाची उभारणी केली. पुढे हेच घराणे तुळशीबागवाले म्हणून ओळखले जाऊ लागले. सरदार खासगीवाले यांच्याकडे कारकून पदावर असणाऱ्या खिरे याना नानासाहेब पेशव्यानी सुभेदारी दिली होती. नारो अप्पाजी हे आपल्या कारभारात अत्यंत कुशल होते व आपल्या कारकिर्दीत त्यांच्यावर एकदाही गैरव्यवहाराचा ठपका बसला नाही. त्या काळी खासगीवाले यांची बाग ही पुण्याची सीमा होती. सध्या दिसत असणारी मंडई या भागात खासगीवाल्यांची मोठी बाग होती, तुळशीबागवाले यांनी खासगीवाले यांच्याकडून एक एकराची बाग विकत घेतली आणि तिथे अनेक देवालायांचा परिसर उभा केला.
दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बांधण्यात आलेला बुधवार वाडा हा सध्याच्या बुधवार चौकात होता, पुण्याते विश्रामबागवाडा, बुधवारवाडा आणि शुक्रवारवाडा असे तीन वाडे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पुण्यात बांधण्यात आले. पैकी बुधवार वाड्यात कचेरीचे काम प्रामुख्याने होते असे. हा वाडा सन १८७९ मध्ये लागलेल्या आगीत जाळून खाक झाला.
बुधवार पेठे ही शनिवार पेठेला लागून असल्याने पेशव्यांच्या काळात येथे बरीच वस्ती झाली होती. तसेच मोठ्या मोठ्या सरदारांच्या असणाऱ्या बाग यामुळे या पेठेला बरेच महत्व होते. अनेक मंदिरे, भव्य बागा, पेशव्यांचा वाद, कोतवाल चावडी यांमुळे ही पेठ तेव्हाही प्रसिद्ध होतीच तसेच आजही तुळशीबाग, दगडूशेठ मंदिर, भाजी मंडई यासारख्या परिसरामुळे या पेठेचा परिसर हा अगदी गजबजून गेलेला असतो.
फोटो -
१. तुळशीबाग राम मंदिराचा कळस
२. तुळशीबाग राम मंदिराचा तत्कालीन फोटो - सिद्धार्थ जोशी
३. नव्या मंडईचे एक रेखाचित्र
४. हरवलेले पुणे या अविनाश सोवनी लिखित पुस्तकातील खासगीवाले बाग परिसराचा नकाशा
माहिती व छायाचित्र आभार :
शंतनू परांजपे
Comments
Post a Comment