रहाळकर श्रीराम मंदिर सदाशिव पेठ, पुणे नागनाथपारावरून शनिपाराकडे जाताना डाव्या हाताला श्रीरामतीर्थ या इमारतीमध्ये एक श्रीराम मंदिर आहे. तेच रहाळकर यांचे पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर. या मंदिराच्या नावाची पाटी वेलींनी झाकली गेल्यामुळे हे मंदिर लवकर लक्षात येत नाही. हे मंदिर सुमारे १८३ वर्ष जुने आहे. या मंदिरात श्रीरामाची सिंहासनाधिष्टीत पंचायतन मूर्ती बघावयास मिळते. श्रीराम कार्याचा व स्थळांचा ऐतिहासिक अभ्यास केलेले कै. श्री अमरेंद्र गाडगीळ यांनी ही मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असल्याचे सांगितले. प्राचीन ग्रंथांमध्ये रामरायाच्या अभिषेकाचे जे वर्णन आहे तशी हि मूर्ती आहे, म्हणून त्याला पट्टाभिषिक्त श्रीरामपंचायतन म्हटले जाते. सिंहासनावर बसलेले श्रीराम-सीता डावीकडे शत्रुघ्न व उजवीकडे लक्ष्मण व भरत आहेत. तसेच भालदार- चोपदार, नल-नील, जाम्बूवान, सुग्रीवादी आहेत. एकाच संगमरवरी दगडात हे सर्व कोरुन शिल्पकाराने ही किमया केली आहे. या मंदिरातील रामपंचायतन मूर्ती काही कारणामुळे काकिर्डे सराफांकडे गहाण म्हणून ठेवली होती. ती विकण्याचा मानस त्यांनी प्रकट करताच, श्री गणेशराम बाबा रहाळकर रा...