Skip to main content

रहाळकर श्रीराम मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) / Rahalkar Shreeram Mandir, Sadashiv Peth ( Pune )


रहाळकर श्रीराम मंदिर
सदाशिव पेठ, पुणे

नागनाथपारावरून शनिपाराकडे जाताना डाव्या हाताला श्रीरामतीर्थ या इमारतीमध्ये एक श्रीराम मंदिर आहे. तेच रहाळकर यांचे पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर. या मंदिराच्या नावाची पाटी वेलींनी झाकली गेल्यामुळे हे मंदिर लवकर लक्षात येत नाही. हे मंदिर सुमारे १८३ वर्ष जुने आहे.

या मंदिरात श्रीरामाची सिंहासनाधिष्टीत पंचायतन मूर्ती बघावयास मिळते. श्रीराम कार्याचा व स्थळांचा ऐतिहासिक अभ्यास केलेले कै. श्री अमरेंद्र गाडगीळ यांनी ही मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असल्याचे सांगितले. प्राचीन ग्रंथांमध्ये रामरायाच्या अभिषेकाचे जे वर्णन आहे तशी हि मूर्ती आहे, म्हणून त्याला पट्टाभिषिक्त श्रीरामपंचायतन म्हटले जाते.

सिंहासनावर बसलेले श्रीराम-सीता डावीकडे शत्रुघ्न व उजवीकडे लक्ष्मण व भरत आहेत. तसेच भालदार- चोपदार, नल-नील, जाम्बूवान, सुग्रीवादी आहेत. एकाच संगमरवरी दगडात हे सर्व कोरुन शिल्पकाराने ही किमया केली आहे.

या मंदिरातील रामपंचायतन मूर्ती काही कारणामुळे काकिर्डे सराफांकडे गहाण म्हणून ठेवली होती. ती विकण्याचा मानस त्यांनी प्रकट करताच, श्री गणेशराम बाबा रहाळकर रामदासी यांनी ती पाहिली व त्यांचे मनात ती मूर्ती भरली. परंतु द्रव्याभावी ती त्यांना विकत घेता आली नाही व खिन्न मनाने ते घरी परतले. काही दिवसांनी श्री काकिर्डे सराफ यांना पोटशूळ झाला. त्यांनी बरेच उपाय केले पण कशानेही त्यांना बरे वाटेना. एक दिवस पहाटे स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला की, सदर मूर्ती गणेशराम बाबा रहाळकर रामदासी यांचेकडे पोचवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर श्री काकिर्डे सराफ यांनी सदर मूर्ती सवाद्य मिरवणूक काढून पालखीतून श्री गणेशराम बाबा रहाळकर यांचे घरी विनामूल्य पोचविली. त्यानंतर काकिर्डे सराफ यांचा पोटशूळ कमी झाला.

थोड्या दिवसांनी गणेशराम बाबा रामदासी यांनी या वास्तुत भव्य मंदिर बांधून रंगपचमी फाल्गुन व ५ शके १७६० मार्च सन १८३८ या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. समर्थ संप्रदायानुसार येथे मूर्तीची उपासना गेली १८३ वर्षे चालू आहे. मंदिराचा सभामंडप फारच जुना झाल्यामुळे नवीन सभामंडप सन १९९९ साली सध्याच्या मालकांनी बांधला व रंगपंचमी शके १९२२ दि.२५ मार्च २००० यादिवशी श्रीरामचरणी समर्पण केला.

गुढीपाडव्यापासून रामनवमी पर्यंत इथे रामाचे नवरात्र असते. आवर्जून सांगावे असे इथले १ वैशिष्ट्य म्हणजे, रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीला कौसल्येचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणून एखाद्या गरोदर स्त्रीला बोलावून तीचे यथोचित डोहाळे जेवण केले जाते. ही पध्दत् इतरत्र कुठेही बघायला मिळत नाही. डोहाळे जेवण व श्री रामजन्माचा सोहळा बघण्यासारखा असतो. गेली १८३ वर्षे रामसेवेची हि परंपरा रहाळकर कुटुंबियांकडून अविरत चालू आहे.

संदर्भ :
रहाळकर परिवार

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...