श्री भाजीराम मंदिर
नारायण पेठ - पुणे
केळकर रोडवर असलेल्या केसरी वाड्यावरून अलका चौकाकडे जाताना नारायण पेठ पोलीस चौकीच्या समोर एक १००/१५० वर्षापूर्वीचे राम मंदिर लागते. श्री भाजीराम मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे. हे पेशवेकालीन मंदिर अंदाजे इ.स. १७६१ / ६२ च्या दरम्यान बांधले गेले आहे. हे मंदिर तुळशीबाग राम मंदिराच्या समकालीन आहे. पूर्वी या ठिकाणी भाजी विकायला विक्रेते बसत असत, म्हणून त्या ठिकाणी असलेल्या मंदिराला भाजीराम मंदिर असे नाव पडले. पेशवेकालीन दफ्तरात या मंदिराचा उल्लेख आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून, पूर्वी या मंदिराचा गाभारा दगडी होता. सध्या बांधलेलं मंदिर हे नवीन आहे. मंदिरामध्ये लाकडी नक्षीदार देव्हाऱ्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्ती दगडी चौथऱ्यावर उभ्या आहेत. मूर्तीच्या मागे छोटी नक्षीदार प्रभावळ आहे. श्री रामाच्या मूर्तीवर छोटेसे छत्र लटकवलेले आहे. त्या मूर्ती अंदाजे दोन ते अडीच फुटांच्या आहेत. मूर्तीच्या एका बाजूला शेंदुरचर्चीत गणपतीची लहान मूर्ती तर दुसऱ्या बाजूला संगमरवरी हनुमानाची छोटी मूर्ती आणि काळ्या पाषाणातली महादेवाची पिंड आणि नंदी आहे.
रामनवमीमध्ये रोज पवमानाचा अभिषेक असतो. नऊ दिवस कीर्तन, भजन, प्रवचन व अखंड रामनामाचा जप असतो. रामनवमीच्या दिवशी देवाची मूर्ती पाळण्यामध्ये ठेवली जाते. रामजन्माचे कीर्तन झाल्यानंतर पाळणा म्हणून रामजन्म केला जातो. त्यानंतर प्रसाद दिला जातो आणि संध्याकाळी रामाची पालखी निघते. दशमीला पारणे होऊन उत्सवसमाप्ती होते. देवगिरीकर कुटुंब मंदिराची व्यवस्था पाहतात.
संदर्भ :
▪︎ असे होते पुणे ( म. श्री. दीक्षित )
▪︎ पुणे शहरातील मंदिरे ( डॉ. शां. ग. महाजन )
Instagram :
▪︎ @punesehai
▪︎ @travelwala.chora
Comments
Post a Comment