Skip to main content

गुढी पाडवा / Gudi Padwa


गुढी पाडवा
चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढीपाडवा असे नाव असून या तिथीला वर्ष प्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष (इ. स. सु. ७८ वर्षांनंतर) या दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारतात तसेच भारताच्या इतर भागात नूतन वर्षारंभ याच दिवशी मानतात. ‘शालिवाहन’ ‘सातवाहन’चा अपभ्रंश असावा. सातवाहनांपैकी कोणी व कोणत्या प्रसंगी हा शक सुरू केला, हे निश्चितपणे सांगता येत नाही. शक हे परकीय असून त्यांच्यावर सातवाहनांनी मिळविलेल्या एखाद्या महत्त्वाच्या विजयदिनापासून ह्या शकाची सुरुवात झाली असावी, असे काही विद्वान मानतात. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात वर्षाचा आरंभ निरनिराळ्या देशांत भिन्नभिन्न महिन्यात होत असे. सु. ८०० वर्षांपूर्वी काश्मीर प्रांतात चैत्र हाच महिना प्रथममास मानीत, असे इतिहासकार अल बीरूनीच्या लेखांवरून दिसते. चैत्र शुद्ध १ हा दिवस तेथील लोक मोठ्या उत्साहाने पाळीत व हा परशत्रूस राजाने मागे हटविल्याचा दिवस आहे, असे ते समजत. गुप्तराजांची सत्ता एके काळी उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र पसरली होती, तेव्हा चैत्रारंभी वर्षारंभ होत असे, असे प्राचीन लेखांवरून दिसते.

वसंत ऋतूचा आरंभ याच दिवशी होतो. अनेक उत्सव या ऋतूस योग्य असल्याचे रूढ आहे. चैत्र मास अधिक मास असल्यास नूतन वर्षाचा आरंभ अधिकमासीच होतो. या तिथीला ‘युगादितिथी’ असेही म्हणतात. या दिवशी शक्य असेल तर पाणपोई घालावी. चैत्रापासून चार महिन्यांपर्यंत प्राणिमात्रास जलदान करावे, असे सांगितले जाते. हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त असून कोणत्याही नवीन कार्यारंभास हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, अशी श्रद्धा आहे. पुराणात गुढी पाडव्यादिवशी काही धार्मिक विधीही सांगितले आहेत. त्यात ब्रह्मपूजा हा महत्त्वाचा विधी असतो. महाराष्ट्रासारख्या ज्या काही प्रांतांत वर्षाचा आरंभ चैत्र महिन्यापासून होतो तेथे त्या महिन्याची पहिली तिथी समारंभाने आणि धार्मिक विधी करून साजरी करण्यात येते.

श्रीरामचंद्र चौदा वर्षे वनवास करून सीतेसह आपल्या नगरीत परत आला तो दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदा होता, यासाठी हा दिवस वर्षाचा पहिला दिवस मानतात. वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला व त्याला स्वर्गातील अमरेंद्राने या दिवशी वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला. ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेस सृष्टी निर्माण केली, अशा कारणांनी हा दिवस संवत्सराचा पहिला दिवस ठरला. अशा अनेक धार्मिक समजुती या सणामागे आहेत.

या दिवशी मंगलस्नान करून स्त्रीपुरुष, मुले नवीन वस्त्रे परिधान करतात. घरासमोर गुढ्या-तोरणे उभारतात. बांबूच्या किंवा कळकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे वा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ व साखरेची माळ बांधतात आणि पूजापूर्वक ती सजवलेली गुढी दारात उभारतात. गुढी उभारण्यावरूनच या दिवसास ‘गुढी पाडवा’ म्हटले जाते. शिवाय दरवाजासमोर चौरंग ठेवून त्याच्यावर ठेवलेल्या कलशाची पूजा करण्याचाही प्रघात काही ठिकाणी आहे. कलश व पताकायुक्त गुढी ही आनंदोत्सवाची दर्शक आहे. या सणाच्या निमित्ताने होणारे जलदान, निंबभक्षण हे निसर्गप्रेमाचे निदर्शक आहे. कडुलिंबाची पाने, मिरे, हिंग, लवण, जिरे व ओवा यांसह खाल्ली असता आरोग्य, बल, बुद्धी व तेजस्विता प्राप्त होते, असे म्हटले जाते.

प्रत्येक धर्मात वर्षारंभाचा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो. त्यादृष्टीने चैत्रारंभ हा वर्षारंभाचा दिवस हिंदू लोक मानतात. नूतन वर्षाच्या उदयाबरोबर अंतःकरणात नवीन आशांकुर उत्पन्न होऊन नवीन वर्ष आनंदात जावो, अशी सदिच्छा उत्पन्न होत असते. त्यामुळे एकमेकांची प्रेमाने भेट घेऊन सदिच्छा देण्याबरोबरच आपल्या अंतःकरणात सत्कर्माबद्दल उमेद व दुष्कर्माबद्दल पश्चात्ताप उद्भवून आपले वर्तन सुधारण्यासाठी प्रेरणा देणारा हा सण महत्त्वाचा मानला जातो.

संदर्भ :
• आर्यांच्या सणांचा इतिहास, व्ही. प्रभा आणि कंपनी, मुंबई, १९६४.
• ‘ऋग्वेदी−दुभाषी, वामन मंगेश, आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास, वाई, १९७९.
• भट, यशवंत आबाजी, भारतरत्न म. म. डॉ. काणेकृत धर्मशास्त्राचा इतिहास (उत्तरार्ध), साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९७०

माहिती आभार :
सरोजकुमार मिठारी ( मराठी विश्वकोश )

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...